भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – लकीभाऊ जाधव यांना हरवण्यासाठी त्र्यंबकमध्ये होतो तसा कुंभमेळा करण्याचा अयशस्वी प्रयत्न विरोधक करत आहेत. मात्र काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसच्या उपकारावर गद्धारी करून मते मागणाऱ्यांना मते देऊ नका. या निवडणुकीत ज्यांनी ५० खोके घेतले त्यांना आता घरी बसवा. या लोकांनी चोरी करून सरकार स्थापन केले आहे. हे चोरांचे सरकार आहे. मोदी हे खोटारडे असून त्यांनी दिलेली आश्वासने कधीच पूर्ण केली नाही, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. २०१४ च्या निवडणुकीवेळी प्रत्येकाला १५ लाख देण्याचे आणि २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, पण ते पूर्ण केले नाही. मोदींनी शेतकऱ्यांना धोका दिला. शेतीमालाला दुप्पट भाव देणार असे म्हणाले होते. ज्यांनी हमीभावाची रक्कम वाढवली नाही, ते शेतीमालाला दुप्पट भाव काय देणार, खोट्या मोदीला शेतीचे काळे कायदे सुद्धा बदलायला लागले असा घणाघात खरगे यांनी केला. आवाज दो हम एक हैचा त्यांनी सर्वांना नारा दिला. इगतपुरी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी इंदिरा काँग्रेसचे अधिकृत उमेदवार लकीभाऊ जाधव यांच्या प्रचारार्थ त्र्यंबकेश्वर येथे आयोजित सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकशाही आणि संविधान टिकले नाही तर आपण संपून जाऊ. केंद्र सरकार जे आश्वासन देते ते पूर्ण करत नाही. ही नरेंद्र मोदी यांची सवय आहे. काँग्रेस सरकारने काळा पैसा बाहेर ठेवला आहे. तो परत आणून मी प्रत्येकाला १५ लाख रुपये देईल, असे मोदी म्हणाले होते. पण त्यांनी कुणालाही पैसे दिले नाही. मोदींनी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. पण तेही पूर्ण केले नाही. पंतप्रधान अशाप्रकारे खोटे बोलतात, ते खोटारड्यांचे सरदार आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी मराठी अभंगाची ओळ बोलून श्री. खरगे यांनी बराचवेळ मराठी भाषेत संवाद साधला. उमेदवाराचे नाव लकीभाऊ कसे ठेवले याची त्यांनी उमेदवाराला माहिती विचारली यावेळी लकीभाऊ जाधव यांनी आईवडिलांना लकी ठरलो म्हणून असे नाव ठेवल्याचे सांगितले. श्री. खरगे यांनी यावेळी काँग्रेस पक्षाला पण तुम्ही इगतपुरीतुन लकी ठराल अशी शुभेच्छा दिली. मोदींचे अदानी आणि अंबानी हे दोनच मित्रच आहे. त्यांच्यासोबत आणखीनही बरेच श्रीमंत लोक आहेत. देशातील ५ टक्के लोकांकडे देशाची ६५ टक्के संपत्ती आहे. तर ५० टक्के गरिबांकडे केवळ ३ टक्के संपत्ती आहे. यावरून सत्ताधारी गरिबांना मदत करतील की श्रीमंतांना हे बघून घ्या अशी घणाघाती टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
श्री. खरगे यांनी भाषणात काँग्रेसची पंचसूत्री घोषित केली. नोटबंदी, शेतकरी आत्महत्या, हमीभाव, अंधभक्त आदी विषयांवर संवाद साधत लोकांच्या टाळ्या मिळवल्या. आदिवासी नृत्याने स्वागत आणि तीर कामठा देऊन स्वागत करण्यात आले. सभेवेळी खासदार शोभा बच्छाव, नासिर हुसेन, प्रदेश नेते राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, शरद आहेर, शेकापचे प्रदेश नेते संदीप पागेरे, काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, माकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, वंदना पाटील आदी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. ही सभा प्रचंड जनसमुदायाच्या रेकॉर्डब्रेक उच्चांकी गर्दीने फुलून गेली होती. सभेसाठी प्रचंड संख्येने हजारो लोकांची गर्दी झालेली असतांना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सभापूर्व भाषणे सुरु होती. यावेळी अचानक सोसाट्याचे वादळ आल्याने मंडपाचा काही भाग उडायला लागला. मात्र उपस्थित नागरिकांची तात्पुरती धावपळ उडाली मात्र काही वेळातच वातावरण साधारण झाले. कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहकार्य करून पुन्हा मंडप दिमाखात उभा केला. यावेळी हजारो नागरिकांचा जनसमुदाय आपल्या जागेवरून उठले नाही. इगतपुरी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी आपल्या भाषणात नागरिकांच्या सहकार्याचे कौतुक केले. येऊद्या अशी हजारो वादळे… हा लकीभाऊ जाधव डगमगणार नाही…! अशी गर्जना करून लकीभाऊ जाधव यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वरमधील आपल्यासारख्या मायबापांची साथ असल्यावर अशी वादळे माझे काही बिघडवणार नाही असा आक्रमक स्वर काढला. यावेळी जनसमुदायाने लकीभाऊ आगे बढोच्या घोषणा दिल्या.