हार्डवेअर दुकाने बंद : वादळामुळे झालेले नुकसान दुरुस्त करण्यात अडचणी

इगतपुरीनामा (विशेष प्रतिनिधी) दि. १९ : राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक पाऊल असले तरी सामान्य नागरिकांना यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतांना दिसत आहेत. काही गोष्टी या ‘जीवनावश्यक’च्या व्याख्येत बसत नसल्या तरी त्यांच्यावाचून नेहमीच काम अडत असल्याने त्या जीवनावश्यक ठरतातच! हार्डवेअरची सेवा ही सुद्धा त्यातलीच एक आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या वादळामुळे शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीसह इतरही भौतिक नुकसान झाले आहे. आज थांबलेल्या वादळामुळे परिस्थिती पूर्व पदावर येत आहे, मात्र झालेली पडझड दुरुस्त करणाऱ्या सामान्य नागरिकांना दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने हार्डवेअरची दुकानं काही वेळासाठी तरी उघडली जावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बहुतांश ठिकाणी इमारतींचे पत्रे उडून जाणे, पडझड होणे, भिंती कोसळल्यामुळे घरातील, शेतीतील साहित्याची मोडतोड होणे, पाण्याची मोटर आणि इतर व्यवस्था नादुरुस्त होणे असे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज वादळ थांबल्याने लोकांनी दुरुस्तीकडे मोर्चा वळवला असला तरी दुरुस्तीसाठी साहित्यच उपलब्ध होत नसल्याने बऱ्याच जणांचा हिरमोड झाला आहे. काही जणांनी उपलब्ध साहित्यातून दुरुस्तीचा प्रयत्न केला असला तरी मोठ्या स्वरूपाच्या मोडतोडीची दुरुस्ती करण्यासाठी साहित्य असल्याशिवाय दुरुस्ती शक्य होत नाही. त्यामुळे निदान दुरुस्ती आवश्यक साहित्य उपलब्ध करण्यापुरते तरी हार्डवेअरची दुकाने उघडावीत यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा इगतपुरीकर बाळगून आहेत.

बंद’चा फटका महावितरणलाही!
दोन दिवसांपूर्वी महावितरण कडून इगतपुरी शहरातील सर्व लाईन स्ट्रक्चरच्या दुरुस्तीचे काम सुरू असतांना मेल लाईनच्या पोलवरील एक गंजलेले स्ट्रक्चर निकामी झाले. नवीन स्ट्रक्चर उपलब्ध झाले पण चॅनल कट करून त्याला होल पाडण्यासाठी नेमके वेल्डिंग दुकाने बंद असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बरीच शोधाशोध करावी लागली. त्यानंतरही फिटिंग साठी लागणारे नटबोल्ट लवकर उपलब्ध न झाल्याने बऱ्याच वेळ गेला आणि त्यामुळे लाईट सुरू व्हायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!