इगतपुरीनामा न्यूज – मधुर फळे, पांथस्थाला सावली, निसर्गालाही पूरक आणि अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी तोडगा आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जिल्हा जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या संकल्पनेतून त्यांच्या पुतण्याच्या लग्नात ११११ केशर आंबा रोपे वाटप करण्यात आली. परंपरागत हुंडा, आहेर, मानपान यांना फाटा देऊन सोनोशी येथील भाऊसाहेब कारभारी गिते यांचे चिरंजीव तुषार आणि पाटोळे येथील सोमनाथ कराड यांची कन्या शोभा या उच्चशिक्षित नवदांपत्याच्या विवाहाप्रसंगी कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानतर्फे काळाशी सुसंगत अशी वृक्षदान ही नवी प्रथा सुरू करण्यात आली. गिते आणि कराड कुटुंबांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, इंद्रभान थोरात, युवानेते उदय सांगळे यांनी विशेष कौतुक केले
हातात आंब्याचे रोपटे घेऊन घरी घेऊन जाणारा आनंदी वऱ्हाडी पाहून विवाहसोहळ्यात खरा आनंद लाभला अशी भावना इंजि. हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केली. वाटप झालेली सर्व आंबा रोपे दर्जेदार, गोड आणि रसाळ फळे देणारी आहे. कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानमार्फत निसर्गपूरक उपक्रम राबवून दूरदृष्टीचे महत्व अधोरेखित केले जाते. त्यामुळे उपस्थित वऱ्हाडी मंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करून समाजोपयोगी कार्यातील कारभारी ( दादा ) शिवार प्रतिष्ठानच्या योगदानाचे कौतुक केले. या उपक्रमाला वऱ्हाडी मंडळींनी अतिशय उदंड प्रतिसाद दिला आणि अवघ्या काही मिनिटांत रोपे संपली. ही रोपे आम्ही नक्की जोपासू अशी भावना वऱ्हाडी मंडळींनी व्यक्त केली. सिन्नर आणि संगमनेर तालुक्यात याप्रकारच्या उपक्रमाद्वारे विवाहातील कालबाह्य झालेल्या खर्चिक प्रथा थांबवण्यास सहाय्य मिळेल अशी प्रतिक्रिया शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांनी सांगितले.