
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ ( किशोर देहाडे, इगतपुरी )
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील ग्रामपंचायतीच्या जन्ममृत्यू रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे जुन्या मृत्यूची नोंद करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी सुनील बांगारे यांनी केली आहे. बेकायदा नोंद करण्याआधी जानेवारी महिन्यात संबंधित ग्रामपंचायतीने नोंद आढळत नसल्याचा दाखला दिलेला असल्याने गैरप्रकार समोर आल्याचे श्री. बांगारे यांचे म्हणणे आहे.
अधिक माहिती अशी की, देवगांव ता. त्र्यंबकेश्वर येथील सुनील सखाराम बांगारे यांना जमिनीच्या वारस नोंदीसाठी सोमा भिका बांगरे यांचा मृत्यू दाखला हवा होता. त्यासाठी त्यांनी जानेवारीमध्ये लेखी अर्ज केला. परंतु १९९९ ते २००४ पर्यंत मृत्यू रजिस्टर मध्ये मृत्यूची नोंद नसल्याबाबतचा दाखला फेब्रुवारीमध्ये त्यांना देण्यात आला. यानंतर संबंधित ग्रामसेवकाची बदली नाशिक तालुक्यात झालेली आहे. असे असतांना त्यांनी टाकेहर्ष ग्रामपंचायत येथे येऊन तेथील शिपाई पावले यांच्या समोर दि.६ फेब्रुवारी २०२१ रोजी बेकायदेशीर पणे सोमा भिका बांगारे यांच्या जुन्या मृत्यूची बेकायदा नोंद केली.
कुठल्याही जुन्या जन्म मृत्यूची नोंद सक्षम न्यायालयाच्या आदेशाने केली जाते. असे असतांना ही नोंद केल्याने सुनील बांगारे यांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र संबंधितांनी ग्रामसेवकावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे सुनील बांगारे, श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे, संतोष निरगूडे, नवसु गारे, पांडुरंग पालवे, कातकरी तालुकाध्यक्ष शिवाजी दराणे, प्रकाश गोडे यांनी म्हटले आहे.