
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
अनेक वर्ष नोकरी, व्यवसाय, राजकारण, पारंपरिक शेती करूनही सामान्य परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत नव्हती. यासह मजुरांचा लहरीपणा, बाजारभावातील अनियमितता, वाढते भांडवल, कोरोना महामारी यामुळे वैताग वाढला होता. यामुळे मनामध्ये उद्विग्नता वाढून नैराश्य पसरले. अशा निर्णायक काळात महाराष्ट्र शासनाच्या रेशीम उद्योगाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ह्या आदिवासी तालुक्यातील जाधववाडी येथील नाना उर्फ सखाहरी जाधव ह्या शेतकऱ्याने यशस्वी होऊन दाखवले. त्यांनी शासनाचे सहकार्य आणि दिवसातील सकाळी आणि संध्याकाळी फक्त २ तास काम करून एक एकरातील तुती लागवड केली. ह्या रेशीम शेतीतुन त्यांनी ६ लाख ५० हजारापेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे. भरघोस उत्पन्न घेण्यासाठी संपूर्ण जाधव कुटुंब सरसावलेले आहे. नाशिक जिल्ह्यात रेशीम उद्योगातील तज्ज्ञ शेतकरी म्हणून नाना जाधव प्रसिद्ध असून ते महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शनही करू लागले आहेत.
स्थानिक कारखान्यात नोकरी, गावचे सरपंचपद, दुग्धव्यवसाय, पारंपरिक शेती आदीमधून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी नाना जाधव यांनी अविरत प्रयत्न केले. तथापि त्यांना यामध्ये यश मिळू शकले नाही. ह्यामुळे त्यांचा मनाची उद्विग्नता वाढून वाईट विचार मनात येऊ लागले. अशा निर्णायक काळात त्यांना तुती लागवड आणि रेशीम उद्योगाबाबत माहिती मिळाली. जिल्हा रेशीम कार्यालयातून विविधांगी माहिती घेऊन त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. शासनाचे तांत्रिक सहाय्य घेऊन त्यांनी आपल्या १ एकर क्षेत्रात रेशीम शेती उभी केली. ह्या योजनेतून सलग तीन वर्ष शासनाकडून योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे. ह्या दुसऱ्याच वर्षी त्यांची रेशीम कर्नाटक आणि नाशिकच्या बाजारपेठेत पोहोचली. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रेशीम असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. ह्यावर्षी त्यांनी निव्वळ नफा ६ लाख ५० हजारापेक्षा जास्त कमावला. भांडवली खर्चाचा विचार केल्यास फक्त १० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झालेला नाही. रोज सकाळी आणि संध्याकाळी २ तास प्रामाणिक आणि निष्ठेने काम करून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील यशस्वी रेशीम उत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या सोबतीला भाचा धनंजय राव, पत्नी तुळसाबाई जाधव, आई जनाबाई जाधव हे मदत करतात. नाशिकचे जिल्हा रेशीम अधिकारी सी. के. बडगुजर, सारंग सोरते, श्री जोशी, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर आदींनी नाना जाधव यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.
आता आयुष्यभर एवढी चांगली असणारी रेशीम शेती सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण कुटुंब ह्या उद्योगात समरस आणि समाधानी झाल्याचा आनंद कुठेही मिळणार नसल्याचे ते सांगतात. जिल्हाभरातील विविध भागातील शेतकऱ्यांना नाना जाधव आणि रेशीम हे समीकरण माहीत झाले आहे. त्यामुळे नाना जाधव यांच्याकडून शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत नेहमी प्रभावी मार्गदर्शन केले जाते. ह्या शेतकऱ्याच्या जिद्ध आणि चिकाटीमुळे इगतपुरी तालुक्यात तालुका कृषी कार्यालयाची मान उंचावल्याचा अभिमान वाटत असल्याचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, सारंग सोरते यांनी म्हटले आहे. नाना जाधव यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. नाना जाधव यांच्याशी 9766273409 ह्या क्रमांकावर संपर्क साधता येईल.