
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
इगतपुरी तालुक्यातील माजी सैनिक विजय कातोरे व वीरनारी संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष रेखा खैरनार यांनी नाशिक जिल्ह्यात शहीद परिवार सन्मान जनजागृती अभियान सुरू केलेले आहे. ह्या अभियानांतंर्गत सटाणा तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यात आल्या. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले. प्रथम भाक्षी गावातील मरणोप्रांत शौर्य चक्राने सन्मानित शहीद जवान बाजीराव धर्मा रौंदळ यांच्या शहीद स्मारकाला आदरांजली वाहून त्यांच्या परिवाराचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर शहीद स्वप्निल रौंदळ यांच्या परिवाराचा विजय पत्र देऊन सन्मान करण्यात आला. निताने येथील शहीद जवान सतीश बळवंत देवरे हे वयाच्या 20 वर्षी देशासाठी शहीद झाले. त्यांचे वीरपिता व वीरमाता यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पिंगळवाडे येथील शहीद जवान कुलदीप जाधव यांच्या गावात सरपंच व ग्रामस्थ यांनी शहीद जवानाला अभिवादन केले. देवळा तालुक्यातील खालप येथील शहीद जवान विजय काशिनाथ निकम यांच्या शहीद स्मारकाला भेट देऊन 1971 भारत पाकिस्तान युध्दात सहभागी असलेले ऑडनरी कॅप्टन नारायण सोनजी काकुळते ज्यांना युद्धात शौर्य दाखवल्याबद्दल “सेना मेडल” ने सन्मानित करण्यात आले त्यांचा विजय पत्र देऊन सन्मान करण्यात आला. चांदवड तालुक्यातील भायाळे गावातील शहीद जवान नायक शंकर चंद्रभान शिंदे “शौर्य चक्र” मरणोप्रांत यांच्या घरी जाऊन त्यांची वीरमाता, विरपत्नी यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सैनिक विजय कातोरे, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष विनोद नाठे, माजी सैनिक रवींद्र शार्दूल, विरनारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रेखा खैरनार उपस्थित होत्या.