७ दिवसांचे बाळ ६ लाखात विकणाऱ्या टोळीचा ठाणे येथे पर्दाफाश ; आरोपींमध्ये ३ जण इगतपुरीचे 

इगतपुरीनामा न्यूज – बदलापूर येथे ७ दिवसांच्या बाळाला ६ लाखांसाठी विकण्याचा कट उधळून लावत पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये ३ जण इगतपुरी येथील असल्याचे समजते. नवजात बाळांची चोरी करून मुलंबाळ नसलेल्या जोडप्यांना विकणाऱ्या टोळीच्या घोटाळ्याचा भाग आहे. शनिवारी देवळाली कॅम्प येथेही बाळ चोरीची घटना घडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात मानवी तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनुसार या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मानवी तस्करी विरोधी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. ७ दिवसांच्या बाळाला ६ लाखात विकण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्री होण्यासाठी बनावट ग्राहकाचा वापर केला. टोळीसोबत संपर्क साधून बुधवारी २४ डिसेंबरला रात्री बदलापूर भागातील एका हॉटेलजवळ भेटण्याचे ठरवण्यात आले. सुरुवातीला या टोळीला टोकन म्हणून २० हजार देण्यात येऊन उरलेले ५ लाख ८० हजार रोख दिले जाणार होते. बनावट ग्राहकाने इशारा दिल्यानंतर, पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या ५ जणांना अटक केली. शंकर संभाजी मनोहर, वय ३६, रेश्मा शहाबुद्दीन शेख, वय ३५, नितीन संभाजी मनोहर, वय ३३, शेखर गणेश जाधव, वय ३५, आणि मुंबई मानखुर्द येथील एजंट आसिफ चांद खान, वय २७ अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या टोळीतील सबीना नावाची सहावी साथीदार फरार झाली असून तिचा शोध सुरु आहे. यामध्ये इगतपुरीतील ३ जण असल्याचे समजते.

error: Content is protected !!