पेन्शनच्या एल्गारसाठी भारत छोडो यात्रा आज नाशकात : राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या उपस्थितीत होणार सभा

इगतपुरीनामा न्यूज – राज्यात मागील काही वर्षांपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी प्रचंड मोठे आंदोलन उभे राहिले आहे. मार्चमध्ये झालेल्या राज्यव्यापी संपानंतर सदर मागणीने आणि संघटनेने रौद्ररूप धारण केले आहे. जुनी पेन्शन बंद करून  देण्यात येणारी नवीन पेन्शन स्कीम अर्थात एनपीएसच्या विरोधासाठी एनएमओपीएस राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या नेतृत्वाखाली बिहार येथील चंपारण येथून १ जून पासून एनपीएस निजीकरण भारत छोडो यात्रेची सुरुवात करण्यात आलेली होती. शुक्रवारी २३ ला ही यात्रा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली असून मुक्ताईनगर, बुलढाणा, जालना, अहमदनगर, पुणे मार्गे आज यात्रा नाशिक मध्ये दाखल होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर नाशिकला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचवटी येथील जनार्दन स्वामी मठातील भक्तनिवास येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यासोबतच धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील ह्या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर हे करत आहेत. गेल्या मार्च महिन्यात झालेल्या राज्यव्यापी संपानंतर सरकारने समिती गठीत करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झालेला नसून पुढील काळात जुनी पेन्शनच्या मागणीसाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन बघायला मिळणार आहे. देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्यानंतर महाराष्ट्रात सदर योजना लागू करण्यात यावी या मागणीला घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार बंधू सभेत सरकारवर काय घणाघात करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील आणि विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याविषयी जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारण्यांनी आवाहन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!