
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली हवे. नगराध्यक्षपदासाठी ४ तर नगरसेवक पदासाठी ७७ अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. सहा उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे अवैध ठरले. अनेकांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळणार नसल्याची शक्यता असल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे राजकीय पेच वाढला असला तरी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होईल. चौरंगी, पंचरंगी लढत होईल असे संकेत मिळत आहेत. दरम्यान आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्था अंतर्गत विविध पथके सक्रिय झाली आहेत. निवडणुकीतील तक्रारी व सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. आचारसंहिता कक्षाचा संपर्क क्रमांक 02553-244010 असा असून यावर तक्रारी देता येतील. छायाचित्रीकरण सर्वेक्षण पथक हे सभा, मिरवणूक यांसारख्या ठिकाणी कार्यरत करण्यात आलेली आहेत. ह्या पथकाद्वारे निवडणूक संदर्भातील सभा, मिरवणूक यावर लक्ष ठेवले जात आहे. भरारी पथकाद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी लक्ष ठेवले जात आहे. शहरातील प्रत्येक घडामोडीवर भरारी पथकाद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाकडून महिंद्रा पोलीस चौकी इगतपुरी व बोरटेंभे चौफुली या ठिकाणी शहरात प्रवेश करणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. आदर्श आचारसंहिता काळात नियमांचे पालन करणे सर्व उमेदवार, राजकीय पक्ष, जाहिरातदार, माध्यमे, वृत्तपत्र प्रकाशक यांच्यासह सर्वांसाठी बंधनकारक आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी, उल्लंघन झाल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांन्वये कायदेशीर कारवाई केली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी दिली.