
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांच्यासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी तासभर झालेल्या चर्चेत ना. पवार यांनी इगतपुरीची माहिती जाणुन घेतली. गत २५ वर्षांपासून इगतपुरी नगरपरिषदेवर शिवसेना उबाठा गटाची सत्ता असून त्यांनी शहराचा विकास न केल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या शहराकडे अजित दादांनी स्वतः लक्ष घालावे अशी विनंती आमदार हिरामण खोसकर, माजी उपनगराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, ज्ञानेश शिरोळे, संजय खातळे यांनी केली. सौंदर्याने नटलेल्या इगतपुरीच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून यावेळेस नक्कीच बदल घडवणार असे पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश नाना शिरोळे, युवा नेते मंगेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद आदी उपस्थित होते.
इगतपुरी शहराच्या विकासासाठी आम्ही अजित दादांकडे गेलो होतो. उपमुख्यमंत्री ना. पवार स्वतः लक्ष देणार असल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल. शहरातील अनेक समस्या त्यांच्याकडे मांडण्यात आल्या. नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे.
- फिरोज पठाण, माजी उपनगराध्यक्ष इगतपुरी