टेम्पोच्या धडकेत वाडीवऱ्हे जवळील अपघातात १ युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

मुंबई आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे फाट्यावर नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या मोटरसायकलला आयशर टेम्पोने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज मंडळ कार्यालयासमोर ही घटना घडली. जगतगुरू नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी गंभीर जखमीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला.

अधिक माहिती अशी की, नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी मोटार सायकल क्रमांक MP 10 MC 1418 हिला पाठीमागून येणारा आयशर टेम्पो MH 04 JU 6477 ह्याने जोरदार धडक दिली. यामध्ये मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. येथून जाणारे इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे यांनी घटना घडताच जगतगुरू नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना कळवले. त्यांनी तात्काळ धाव घेत संबंधित जखमी व्यक्तीला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णाचा जीव बचावला आहे. मोटारसायकलस्वाराचे नाव समजू शकले नाही. आयशर टेम्पोचालक पसार झाला. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.