लेखन – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर
भारतात अनेक थोर महापुरुषांनी जन्म घेऊन आपल्या कार्याचा ठसाही उमटवला. खूपशा महापुरुषांनी देशहितार्थ अनेक कार्य केलीत. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, क्रांतीसुर्य, युगपुरुष , महामानव, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यांच्या जयंती उत्सवनिमित्त…
१४ एप्रिल १८९१ रोजी
दिवस उगवला सोनियाचा
१४ वे रत्न आले जन्मास
क्षण असे हा आनंदाचा
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म रामजी व भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी सपकाळ घराण्यात झाला. रामजी सपकाळ यांना एकूण १४ अपत्य होती. त्यापैकी १४ वे रत्न म्हणून भीमराय जन्मास आले. आणि तोच दिवस सोनियाचा दिवस ठरला. रामजींना वाचनाची खूप आवड होती. ते स्वतः तर पुस्तके वाचत आणि सोबतच आपल्या मुलांनाही चांगली पुस्तके वाचण्यास देत. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत याची ते नेहमी दक्षता घेत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी शाळेत बसू देत नव्हते. तरी त्यांनी खचून न जाता वर्गाच्या बाहेर राहून खिडकीतून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षण घ्यायला भीम परदेशाला गेले तरी रमाने त्यांना कधी अडवले नाही. बाबासाहेबांची पुस्तकांशी गाठ मैत्री होती. दिव्याच्या प्रकाशात पुस्तकांसोबत त्यांनी कित्येक रात्र काढल्या.
नंतर १९०६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( वय १५ वर्ष ) व रमाबाई ( वय ८ वर्ष ) असताना लग्नबंधात जुळले गेले. अत्यंत नाजूक परिस्थिती असतानासुद्धा रमाबाई डगमगल्या नाही. त्यांनी बाबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ दिली. क्रांतीसुर्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान करुन, पावाच्या तुकड्यावर दिवस काढले. परिस्थिती अत्यंत हलाखीची/गरिबीची असली तरी पाठोपाठ रमाची त्यांना साथ होती. फाटकं लुगडं जरी नशिबी असलं तरी रमाबाईंना त्यांच्या सौभाग्याचं लेणं म्हणजेच कुंकू प्रिय होता आणि कुंकूच तिचा दागिना होता. डॉ. बाबासाहेबांनी त्यांना लिहण्या वाचण्यास शिकवले. पुढे बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले असताना रमाबाई त्यांना पत्र पाठवत. बाबासाहेब रमाबाईंना प्रेमाने रामू म्हणून हाक मारायचे. कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहूजी महाराज यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अनेक पदव्या प्राप्त केल्या. डॉ. बाबासाहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व होते. ज्यांनी स्वतः झटून समाजासाठी अतोनात कष्ट उपसले. ज्यावेळी एका भाकरीच्या तुकड्यासाठी कित्येक हालअपेष्टा सोसाव्या लागत होत्या. आज त्यांच्याच पुण्याईने जीवनाचं सोनं झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विविध क्षेत्राचे ज्ञान होते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, कायदेविषयक अशा विविध क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटला आहे.
जनसामान्यांत जातीभेदाप्रती असलेला क्लेश, शोषित पिडीतांच्या, दीनदलितांच्या उद्धारासाठी, त्यांच्या जीवनातील अंधारमय काळोख दूर करून तेजोमय उजाळा देण्याचं कार्य ह्या एकाच महामानवाने पूर्ण केले. माझ्या बांधवांना मूलभूत अधिकारांची गरज आहे , त्यांच्या गलिच्छ किंवा मुर्दाड झालेल्या मनाला न्याय हक्कांची गरज आहे, फक्त चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रियांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरण्याची व शिक्षणाची गरज आहे इत्यादींचे अनुकरण करत त्यांनी देशाची राज्यघटना लिहून सामान्य जनतेला न्याय हक्क मिळवून दिले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. नातं जरी रक्ताचं नसलं तरी लाखो भारतीयांसाठी त्यांनी आयुष्याची वात पेटविली. रक्ताचे करून पाणी, हरपून सारे देहभान, आपल्या जीवाचे रान करून कित्येक दिवस पाण्याच्या घोटावर काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस ह्या कालावधीत त्यांनी देशाची राज्यघटना पूर्ण केली. ही राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने स्विकारून २६ जानेवारी १९५० रोजी लागू केली. भारतीय संविधानामुळे समाजवादी, सार्वभौम धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी अनेक मूलभूत अधिकार प्राप्त झालेत. आज संपूर्ण विश्वाला बाबासाहेबांनी संविधानातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक न्याय, मानवतेची शिकवण मिळवून दिली. संविधानात जातीपातीचा भेदभाव न करता आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम असे बाबासाहेबांनी नमूद केले. अशा ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला जयंती उत्सवनिमित्त कोटी कोटी वंदन..!
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps