
इगतपुरीनामा न्यूज – ५ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास दोन मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात ४ आरोपींनी संगनमत करून मुंबई आग्रा महामार्गावर टाके शिवारात सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या ट्रकमधील चालक व क्लिनर यांना चाकूचा धाक दाखवला. त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करून मोबाईल फोन व रोख रक्कम असा २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने लूटमार करून नेला होता. या घटणेबाबत इगतपुरी पोलीस ठाणे येथे गुरन १७२/२०२५ भा. न्या. सं. ३०९(४), ११५,३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता. ह्या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुप्त बातमीनुसार सचिन नामदेव घाणे, रा. बारशिंगवे, ता. इगतपुरी, जि. नाशिक यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याचे इतर साथीदार त्यात दोन विधिसंघर्षितग्रस्त यांनी मिळून हा गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. ह्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल इनफिक्स कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या गुप्त माहितीनुसार पोलीस अंमलदार प्रविण काकड, संतोष दोंदे, नवनाथ शिरोळे, योगेश पाटील, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, मयूर कांगणे यांनी केली.