वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर कोरोना योद्धयांचा दर्जा द्या ; महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ ( समाधान कडवे, वैतरणानगर )

मार्च २०२० ते मे २०२१ पर्यंत तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांना कोरोना महामारीत जीव गमवावा लागला. ह्या अत्यावश्यक सेवेत काम करीत असतांना कोरोना पॉझिटिव्ह लक्षणाने ३२० कर्मचाऱ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली. एप्रिल महिन्यात निधन झालेल्यांची संख्या ९० इतकी आहे. तिन्ही कंपन्यांत कोरोना पिडीत व संक्रमण झालेली व विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या वीज कर्मचाऱ्यांची संख्या १० हजार ४०० इतकी आहे. मयत कर्मचाऱ्यांमधे ५३ कंत्राटी कामगार असून २ हजार ८०४ कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण झालेली आहे. कायम कामगाराप्रमाणे सर्व सवलती या कंत्राटी कामगारांना प्रदान कराव्यात याचा फेडरेशनने आग्रह धरला आहे. अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांची ही स्थिती असतांना राज्य सरकारने उर्जा उद्योगातील कर्मचाऱ्यांना फॅटलाईन वर्कर्स म्हणून दर्जा द्यावा. यासह कोरोना योद्धयांचा दर्जा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सरकारकडे केली आहे.

सर्व कर्मचाऱ्यांचे युध्दपातळीवर लसीकरण करावे

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे निधन व संक्रमणाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांच्या सेवेची आवश्यकता व महत्व लक्षात घ्यायला हवे. शासन व व्यवस्थापनाने त्यांच्या शंभर टक्के लसीकरणाची व्यवस्था करावी. यासाठी खात्यामार्फत यंत्रणा उभारावी. ज्या कर्मचाऱ्यांनी स्वत: कुणाची वाट न पाहता लसीकरण केले असेल किंवा कोरोना रोगाबाबत औषधोपचार केला असेल तर त्यांनी केलेल्या खर्चाची प्रतीपुर्ती खात्यामार्फत करण्यांत यावी अशीही फेडरेशनची मागणी आहे.

कॅशलेस मेडिकल स्किमचा करार करा


तिन्ही वीज कंपन्यातील ९२ हजार कर्मचारी-अभियंते व अधिकाऱ्यांसारही कामगार संघटनांनी मागणी केलेली कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागु करण्यात यावी. वीज कर्मचाऱ्यावर रोगाच्या प्रादुर्भावाने निर्माण परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला दयनीय स्थितीशी सामना करण्यासाठी या वैद्यकिय योजनेची नितांत गरज असल्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने व्यवस्थापनाला कळवल्याची माहीती केंद्रीय उपाध्यक्ष एस. आर. खतीब यांनी दिली आहे.