
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडतीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. १० प्रभागातील २१ सदस्यांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण २१ जागांपैकी ११ जागांवर महिला आरक्षण काढण्यात आले आहे. या सोडतीमुळे अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला असून त्यांनी सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान नगराध्यक्षपदासाठी देखील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण झाले असून नगरपरिषदेत महिलाराज येणार असल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आरक्षण निश्चित झाल्याने उमेदवार निश्चित करून निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन सुरु झाले आहे. यंदाची निवडणूक सर्वच पक्षांनी मनावर घेऊन जिंकण्यासाठी प्रबळ उमेदवार देण्याची तयारी केल्याचे दिसते. बुधवारी काढण्यात आलेल्या सोडतीत प्रभाग क्रमांक १ जागा २ – अनुसूचित जाती , सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक २ जागा २ – अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ जागा २ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ जागा २ – अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ जागा २ – नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ जागा ३ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला २ जागा, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ जागा २ – अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ८ जागा २ – अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्रमांक ९ जागा २- अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १० जागा २ – अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण निश्चित करण्यात आले.
