
इगतपुरीनामा न्यूज – ठाणे येथील न्यू हॉरीझोन इंटरनॅशनल स्कूलतर्फे सामाजिक जाण व शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्याच्या हेतूने धामडकीवाडी येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्यात शाळेच्या प्राचार्या नम्रता मेहता, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. धामडकीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक शप्रमोद परदेशी यांनी विद्यार्थ्यांना शाळेची शैक्षणिक कामगिरी, स्थानिक परिस्थिती आणि सामाजिक जीवन याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी डोंगराळ व आदिवासी भागातील शिक्षणातील आव्हाने आणि यशस्वी उपक्रमांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षिका वंदना भगत यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संवादाचे दुवे दृढ केले. विद्यार्थ्यांनी गावातील मुलांशी गप्पा, गोष्टी आणि गाण्यांच्या माध्यमातून हितगुज साधले. यामुळे दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता व सामाजिक जाणीव वाढीस लागली. दौर्यादरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या गृहभेटी घेऊन त्यांचे जीवनमान, अडचणी व संस्कृती यांचा जवळून अभ्यास केला. सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सॅन्डविच, चॉकलेट, लेखनसाहित्य, साबण, टूथपेस्ट आणि ब्रश वाटप केले. दिवाळी निमित्त शाळेतील विद्यार्थिनींना फॅन्सी ड्रेस वाटप करण्यात आले. शिक्षक दत्तू निसरड यांनी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोकुळ आगिवले, सदस्य चांगुणा आगिवले, बबन आगिवले, लहानू आगिवले, खेमचंद आगिवले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण समाजजीवनाची मौल्यवान अनुभूती मिळाली आणि शिक्षणासोबत सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर धडा घेता आला.
