
इगतपुरीनामा न्यूज – ११ सप्टेंबरला मध्यरात्री सिन्नर तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी परिसरात हिंद रेक्टीफायर कंपनीच्या सिक्युरिटी गार्डला अज्ञात आरोपींनी चाकुचा धाक दाखवुन मारहाण केली. त्याचे हातपाय दोरीने बांधुन कंपनीचे टेस्टींग सेक्शनने गोडाऊन मधील कॉपर वायरच्या बॉबीन व एसी साठी लागणारे कॉपरचे पाईप असे एकुण १ लाख २८ हजारांचे ३२० किलो कॉपरच मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याबाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार प्रविण काकड, विनोद टिळे, संदिप कडाळे, सतिष घुटे, आबा पिसाळ, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणुन कामगिरी केली आहे. याप्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून २ जण अटक करण्यात आले आहे. ह्या घटनेत ७ संशयित आरोपी इगतपुरी तालुक्यातील आहेत.
गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन यावरून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली. त्यानुसार इगतपुरी तालुक्यातील संशयित आरोपींनी हा गुन्हा केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे पथकाने इगतपुरी तालुक्यातील घोटी व नाशिक शहरातुन १) सुनिल रघुनाथ सोनार, वय ३८, रा. राणेनगर, बिंदीया पार्क, स्नेहलता अपार्टमेंट, नाशिक २) ईस्माईल याकुब खान, वय ४५, रा. सोहरतगड, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश, हल्ली रा. घोटी, ता. इगतपुरी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीच्या गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी त्यांचे साथीदार ३) ईरसाद उर्फ लंबु मसुद अली, रा. गोंदे दुमाला फाटा, ता. इगतपुरी, ४) संतोष उर्फ राहुल सोमा हिरवे, ५) हर्षद दशरथ बेंडकोळी, ६) रवि पगारे, ७) वैभव दत्तु मुकणे, ८) राहुल बोडके, सर्व रा. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी यांचेसह तसेच आरोपी ईरसाद उर्फ लंबु याचे इतर साथीदार यांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील माळेगाव परिसरात एका कंपनीतील सिक्युरीटी गार्डचे हातपाय दोरीने बांधुन त्यास चाकुचा धाक दाखवुन मारहाण करून गोडाऊनमधून कॉपरची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी क्र. १ व २ यांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १९७ किलो वजनाची कॉपर वायर, गुन्ह्यात वापरलेली छोटा हत्ती गाडी असा एकुण ३ लाख ७८ हजार ८०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील आरोपींच्या फरार साथीदारांचा पोलीस पथक कसून शोध घेत आहेत. त्यांच्यावर यापुर्वी देखील मालाविरुध्द व शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. ह्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.