गोंदे दुमाला येथे उद्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विशेष ग्रामसभा

इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायत कार्यालयात येथे उद्या बुधवारी विशेष सभा होणार आहे. या सभेत ग्रामपंचायत प्रशासक आणि पदाधिकारी प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.अभियानाच्या माध्यमातून गावागावांत विकासाची स्पर्धा निर्माण होऊन लोकचळवळीला नवसंजीवनी मिळणार आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून गाव हे त्याचे केंद्रबिंदू आहे. गावांचा शाश्वत विकास साधल्या शिवाय देशाचा विकास शक्य नाही. त्यामुळे या अभियानातून गावातील स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, रस्ते, ठिबक सिंचन, शेततळे, बंधारे, जलसंधारण, जलयुक्त शिवार अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न, महिला बचत गटांना बळकटी देणे, तसेच दुग्धोत्पादन, मधमाशीपालन, मत्स्यपालन व कुक्कुटपालनाला चालना देण्यावर भर दिला जाणार आहे.राज्य सरकारने या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून विविध स्तरांवर पुरस्कार जाहीर केले आहेत. तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी गोंदे दुमाला येथे विशेष सभा होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासक, भजनी मंडळ, मुख्याध्यापक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, बचत गट, कृषी आदी विभागाचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!