गोरख बोडके यांच्याकडून २ रुग्णवाहिकांचे औदार्य ; इगतपुरी तालुक्यासाठी झाले मोठे साहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
इगतपुरी तालुक्यात कोरोना संसर्गाची गंभीर परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची कमतरता जाणवत होती. दैनंदिन मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णवाहिकांसाठी नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत होता. यामुळे रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले होते. ह्या पार्श्वभूमीवर शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके लोकांच्या हाकेला धावून आले. त्यांनी स्वतःच्या खर्चातून आज इगतपुरी तालुक्यासाठी 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. कोविड 19 मदत कक्ष ग्रुप इगतपुरी तालुका यांच्यातर्फे रुग्णवाहिकांसाठी पाठपुरावा करण्यात आला. ह्याच ग्रुपच्या साहाय्याने रुग्णांसाठी दोन्ही रुग्णवाहिका अविरत धावणार आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रम प्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते महेश शिरोळे, कोविड मदत कक्षाचे संस्थापक माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, घोटी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, खरेदी विक्री संघाचे संचालक शरद हांडे, इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे आदी उपस्थित होते.

इगतपुरी तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णवाहिकेची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. अनेक ठिकाणी एकाच रुग्णवाहिकेमधून चार ते पाच रुग्ण रुग्णालयात आणले जात आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हत्या. अधिक पैसे मोजूनही अनेकांना मिळत नसलेली रुग्णवाहिका गरिबांना तर रडकुंडीला आणत होती. यामुळे इगतपुरी तालुक्यात रूग्णवाहिकांची टंचाई मोठ्या चिंतेचा विषय झाली होती. ह्या पार्श्वभूमीवर शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना ह्या विदारक परिस्थितीची माहिती समजली. त्यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन स्वतःच्या खर्चातून २ रुग्णवाहिका विकत घेतल्या. ह्या रुग्णवाहिकांच्या इंधनासाठी होणारा खर्चही ते स्वतः करणार आहेत. कोविड 19 मदत ग्रुप इगतपुरी तालुका यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. आज ह्या दोन्ही रुग्णवाहिका इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसाठी लोकार्पण करण्यात आल्या. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते आज हा कार्यक्रम संपन्न झाला.

कोरोना संक्रमण वाढत असल्याने आतापर्यंत गोरख बोडके यांनी विविध प्रकारचे मदतकार्य तालुका वासीयांसाठी केले आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर यंत्र, ऑक्सिजन सिलेंडर, बेड, ऑक्सिजन, विविध इंजेक्शन आदी मदत कार्याचा समावेश आहे. रुग्णवाहिका लागल्यास कोविड 19 मदत कक्ष ग्रामीण तालुका : हरिश्चंद्र चव्हाण, भास्कर सोनवणे, घोटी शहर : श्रीकांत काळे, समाधान जाधव, इगतपुरी शहर :  किरण फलटणकर, वसीम सय्यद ह्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!