
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी सारख्या दुर्गम तालुक्यात भौगोलिक अडचणींवर मात करीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणारे पत्रकार बांधव आव्हानात्मक कामगिरी करीत आहेत. लोकांच्या समस्यांची प्रभावीपणे सोडवणूक करण्यासाठी सर्व पत्रकारांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अशा पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी यापुढील काळात झोकून काम करण्याचा संकल्प केला आहे. पत्रकार बांधवांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी सर्वजण एकजुटीने चांगले काम उभे करू असा संकल्प इगतपुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केला. जगातील ५२ देशांत कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या इगतपुरी तालुका बैठकीत पत्रकारांनी विविध विषयावर सखोल चर्चा घडवून आणली. व्हॉइस ऑफ मीडियाच्या नूतन कार्यकारिणीची बैठक उपजिल्हाध्यक्ष तथा इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. ज्येष्ठ पत्रकार ‘दिशा न्यूज’चे राजू देवळेकर, नूतन इगतपुरी तालुकाध्यक्ष ‘पुढारी’चे विकास काजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इगतपुरी येथे ही बैठक घेण्यात आली. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या इगतपुरी शहराध्यक्षपदी ‘प्रहार’चे सुमित बोधक, डिजिटल सेल शहराध्यक्षपदी ‘दिव्य मराठी’चे संदीप कोतकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे शहाबाज शेख तर खजिनदारपदी ‘टीव्ही 9’चे शैलेश पुरोहित यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार वैभव तुपे, समाधान कडवे, गणेश घाटकर, लक्ष्मण सोनवणे, शरद धोंगडे, एकनाथ शिंदे, शांताराम भांगे, मिलिंद सोनवणे आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या कुटुंबासाठी लाभदायक असणाऱ्या विविध योजनांचे फॉर्म भरून घेण्यात आले. आगामी काळात इगतपुरी तालुक्यात व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम होणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार ‘दिशा न्यूज’चे राजू देवळेकर, नूतन इगतपुरी तालुकाध्यक्ष ‘पुढारी’चे विकास काजळे यांनी सांगितले.