– रविंद्र थेटे, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक
आयुष्यभर कुटुंबासाठी नोकरी केल्यानंतर निवृत्तीनंतर या व्यक्तीला फारसे श्रम न करता कुणाचाही आधार मिळाला नाही तरी सुखकर जीवन जगता यावे यासाठी पेन्शनची योजना देशात पूर्वीपासून सुरू आहे. मात्र, पेन्शन मिळत असले तरी स्वत:ला कुठेतरी गुंतवून ठेवण्याची मानसिकता पेन्शनर्सची वाढत आहे आणि वाढायला पाहिजे. धकाधकीच्या काळात जीवनशैली बदलत चालली आहे. नोकरीत ३०-४० वर्षे सेवा बजावल्यानंतर अचानक घरी स्वस्थ बसून राहणे अनेकांना अवघडवून टाकते. त्यासाठी नोकरीत असतानाच एखादा व्यासंग आपण लावून घेतला पाहिजे. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर एकाकी पण जाणवणार नाही ! पेन्शनच्या रकमेतून खर्च भागवत उर्वरीत आयुष्य कुटुंब, नातवंडांसमवेत आरामात घालवायचे, अशी एकेकाळची मानसिकता आता बदलत चालली आहे. शहरातील पेन्शनर मंडळींकडून विविध क्लब, संघटना किंवा ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमात स्वत:ला व्यस्त ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. कुटुंबातील सदस्यांचा संवाद कमी होत चालल्याने आपण निरुपयोगी न राहता समाजासाठी काही करत आयुष्य सार्थकी लावण्यासाठी पेन्शनर समाजासाठी हातभार लावण्याचे काम करताना दिसत आहे.
पेन्शनचा इतिहास १५० वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र लढ्यानंतर ब्रिटिशांनी हिंदुस्थानात पेन्शन देण्यास सुरुवात केली. १८७१ मध्ये इंडियन पेन्शन अॅक्ट पारित केला; परंतु पेन्शन देणे अथवा न देणे हे गव्हर्नर व व्हाईस गव्हर्नर यांच्यावर अवलंबून होते. संरक्षण खात्यातील अर्थसल्लागार डी एस नाकरा निवृत्ती वेतनासाठी न्यायालयात गेले. त्यांच्या याचिकेवर १७ डिसेंबर १९८३ रोजी निकाल देताना पेन्शन भीक नसून त्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने सांगितले व शासनाला पेन्शन देणे बंधनकारक केले. त्यानंतर १७ डिसेंबर हा पेन्शनर दिन म्हणून साजरा केला जातो आहे.
सर्व्हिसला असताना दुसरे काही करण्यास फारसा वेळ मिळत नाही. निवृत्तीनंतर आपण सेवानिवृत्त एकत्र येवून ज्येष्ठ नागरिक संघाचे ,विविध मंडळे, सामाजिक संस्था यांचे मार्फत काम करतो आहोत. सर्वजण मिळून वर्षभर विविध कार्यात व्यस्त राहतो. माणूस व्यस्त राहिला पाहिजे, समाजाचे काही देणे लागते या हेतूने कार्यात गुंतवून ठेवून कार्य केले पाहिजे. एकमेका साहाय्य करु अवघे धरु सुपंथ या न्यायाने व्यवहार करु ! इतकेच या निमित्ताने …पेंशनर्स डे निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व सेवानिवृत्त जीवन आपणा सर्वांना सुखसमृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यदायी व कोरोना मुक्त जावो हीच सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा