कवितांचा मळा : बंध रेशमाचे

रचना : सौ. माधुरी पाटील, शेवाळे, नाशिक

नारळी पौर्णिमा । सण हा राखीचा
मान तो लेकीचा । माहेराला ।।१।।
नाते जिव्हाळ्याचे । निस्वार्थी पणाचे
महत्व सणाचे । बहिणीला ।।२।।
कपाळी टिळक । भावा त्रैलोचन
मागे संरक्षण । भावाकडे ।।३।।
हातावर राखी । सोबत श्रीफळ
बसत जवळ । पाटावरी ।।४।।
मागते आयुष्य । राखीच्या धाग्याला
प्रेमळ भावाला । देवाकडे ।।५।।
हक्काने मागते । भावा ओवाळुनी
घाल ओवाळणी । हातावरी ।।६।।
नारळ सोडीला । कोळी बांधवाने
प्रेम भावनेने । सागराला ।।७।।
बंध रेशमाचे । नाते भावनेचे
रेशीम धाग्याचे । असतीया ।।८।।
भाऊराया माझा । दिलदार भारी
देखभाल सारी । करतोया ।।९।।
दिस उत्सवाचा । करुनी वंदन
हे रक्षाबंधन । पौर्णिमेला ।।१०।।

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!