
इगतपुरीनामा न्यूज – सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील वालदेवी धरण हे नाशिक शहरालगत आहे. पिंपळद ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार गेल्या ४ वर्षांपासुन नाशिक महानगरपालिका हद्दीतील सिडको, अंबड, पाथर्डी, विल्होळी आदी आजुबाजुच्या ग्रामीण भागातील घरगुती व गणेश मंडळांचे गणेशमुर्ती व गणेशभक्त यांना वालदेवी धरणावर गणेश विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी गणेशभक्तांचे बुडुन मृत्यु होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जलप्रदुषण व ध्वनीप्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. छोटे मोठे गणेशमुर्ती पाण्याच्या कडेला सोडुन दिले जातात व पाणी ओसरल्यानंतर ह्या मुर्तीचे अवशेष उघडे पडल्याने मुर्तीची विटंबना होते. पाण्यात बुडवलेल्या मुर्तीमुळे पाणी खराब होवुन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शेतीसाठी पाणी उपसा करतांना मोटारपंप गणपती मुर्तीच्या मातीखाली गाडले जातात. गणेश विर्सजनाचे निर्माल्य मोठ्या प्रमाणावर परिसरात पडुन घाणीचे साम्राज्य तयार होते. रस्ते वाहतुक जाम होवुन नियोजनासाठी ग्रामपंचायतीची मोठी कसरत होते. यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने वालदेवी धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असुन १०० टक्के धरण भरलेले आहे. २०१९ ते आजपावेतो वालदेवी धरण परिसरात विसर्जन वेळी व पर्यटन निमित्ताने आलेले ११ इसम वालदेवी धरणामध्ये बडुन मयत झाले आहेत. पिंपळद हे प्रकल्पबाधित गाव असुन वालदेवी धरणातील पाण्याचा गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी वापर होतो. या कारणास्तव पिंपळद ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे वतीने वालदेवी धरणावर गणेश विसर्जन करण्याला विरोध दर्शविला असुन धरणावर गणेश मुर्तीचे विर्सजनास बंदी घातली आहे. नाशिक शहर व वालदेवी धरणाच्या आजुबाजुचे गावांतील गणेशभक्तांना गणेश विसर्जनाकरीता वालदेवी धरणावर बंदी आहे. म्हणून या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी येवु नये असे जाहीर आवाहन पिंपळद ग्रामपंचायत, ग्रामस्थ व वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.