इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील सर्व गावे आणि शहर गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्यात कायमच आघाडीवर – पीआय सारिका अहिरराव : आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी येथे बैठक संपन्न 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील सर्व गावे आणि संपूर्ण इगतपुरी शहर शांतताप्रिय आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात कायमच आघाडीवर आहेत. सण उत्सवांच्या काळात सामाजिक जबाबदारीचे भान राखून आनंदाने सण आणि उत्सव साजरे होतात. यामुळे इगतपुरी पोलीस ठाणे हद्धीतील सर्व नागरिक, ग्रामस्थ, मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी कौतुकाला पात्र ठरतात. यामुळेच वरिष्ठ कार्यालय आणि वरिष्ठ अधिकारी येथील सर्वांचे कायदा सुव्यवस्थेतील योगदानाबद्धल समाधान व्यक्त करतात. ह्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव शांततेत व कायदा सुव्यवसस्था राखूनच पार पडेल असा आम्हाला विश्वास वाटतो असे प्रतिपादन इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी केले. इगतपुरी येथे आगामी गणेशोत्सव शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेत पार पाडणेबाबत विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी शासनाकडून व वरिष्ठ कार्यालयाकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत प्राप्त परिपत्रक व सुचनांबाबत माहिती देऊन सखोल मार्गदर्शन केले. नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली इगतपुरी येथील माहेश्वरी मंगल कार्यालय गांधी चौक येथे मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जीवीएस पवन दत्ता, उपविभागीय पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. इगतपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगरपरिषद अभियंता, वीज मंडळ, वैद्यकीय अधिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जीआरपीएफ, आरपीएफ, सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, शांतता समिती, मोहल्ला समिती, महिला दक्षता समिती, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बंधू व पोलीस मित्र ह्या बैठकीत हजर होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पोलीस हवालदार विनोद गोसावी, विजय रुद्रे, निलेश देवराज, महेंद्र गवळी आदींनी परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाचे कायमच सर्वांना सहकार्य असल्यामुळे दरवर्षीप्रमाणेचा येणारा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल. प्रशासनाला शांतता आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आमच्या सर्वांचे आणि जनतेचे परिपूर्ण सहकार्य करण्यात येईल असे उपस्थितांनी याप्रसंगी सांगितले.

error: Content is protected !!