इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात शिवसेना दुभंगवणारे वादळ उभे केले. त्याप्रसंगात आणि शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली त्यानंतरच्याही प्रसंगात स्थिर आणि जैसे थे राहिलेले इगतपुरी तालुक्यातील कट्टर शिवसैनिक दिसून आले. मात्र इगतपुरी तालुक्यातील एक माजी आमदाराच्या रूपाने आता तालुक्यातील शिवसेना फुटीच्या वाटेवर आली असल्याची चर्चा इगतपुरी तालुक्यात रंगली आहे. त्यांच्यामुळे एक भलीमोठी फळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेली पहायला मिळू शकते असे तालुक्यात म्हटले जाते आहे. नवी दिल्लीत त्या माजी आमदाराने शिंदे यांची भेट घेतल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आल्याचे दिसते आहे. यासह खासदार हेमंत गोडसे यांच्या शक्तीप्रदर्शनाला हजर असलेल्या समर्थकांचा सुद्धा यामध्ये चांगलाच हातभार असल्याचे वावडे उठले आहे. यासह संबंधिताचे जुने स्नेहबंध एकनाथ शिंदे यांच्याशी असल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नसल्याचे एका जाणकार व्यक्तीने सांगितले.
एका माजी आमदाराने उध्दव ठाकरे यांचे शिवबंधन सोडून देण्याची तयारी चालवल्याच्या चर्चेने फुटीचा अर्थ काढला जात आहे. माजी आमदाराने मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीचा सिलसिला केल्याने ह्यामध्ये भर पडली आहे अशी चर्चा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि पुढील आमदारकी हा दृष्टिकोन ठेवून एकनाथ शिंदे यांची शिवसेना मजबुत करण्यासाठी पावले उचलायची ही सुरुवात समजली जात आहे. असे असले तरी, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी अजून तरी बाहेर पडलेले नाहीत. अथवा त्यांनी राजीनामा दिलेले नाहीत. आम्ही उध्दव साहेबांच्या सोबतच राहू, असे सर्व तालुक्यातील मूळ शिवसैनिक ठासून सांगताहेत. शिवसेना अभंग असून बाहेर पडतील ते फक्त गद्दार असतील; असा दावा मूळ शिवसैनिकांकडून केला जातो आहे. तालुक्यातील सर्व शिवसैनिक जैसे थे राहणार असून मजबूतीने आलेल्या सर्व लढाया लढवू, अशा भावना शिवसैनिक व्यक्त करतात. आगामी काळात एका माजी आमदारामुळे शिंदेसेना आणि उध्दवसेना यांच्यातील लढाई इगतपुरी तालुक्यात रंगतांना दिसू शकते की काय? हा प्रश्न मात्र इगतपुरी तालुक्यात चर्चेत आला आहे. पुढे काय होते ते पाहून खरे सत्य बाहेर पडण्याची वाट सर्वांना पाहावी लागेल.