वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी गणेशोत्सवानिमित्त बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून गणेशोत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी गणेशोत्सव मंडळांनी घेणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सर्वांनी काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले. वाडीवऱ्हे येथील इंदुमती लॉन्समध्ये आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यक्षेत्रातील गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक श्री. मथुरे बोलत होते. गणेश मंडळांनी प्रक्षोभक देखावे करू नये. डीजेला बंदी घालण्यात आली आहे. वालदेवी धरणावर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी गणपती विसर्जनासाठी बंदी घातली आहे. असे निर्णय सर्वानुमते ह्या बैठकीत घेण्यात आले. याप्रसंगी श्री. मथुरे यांनी गणेश मंडळाच्या अडचणी समजून घेतल्या. सांस्कृतिक, सामाजिक भावना दुखावल्या जातील अशी बॅनरबाजी करू नये, सोशल मीडियावर कुणाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट करू नका. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करा असेही ते म्हणाले. यावेळी गणपती मंडळ अध्यक्ष, सदस्य,शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, सायबर कॅफे धारक, बॅनर फ्लेक्स धारक, वाद्य चालक-मालक, पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड आदी उपस्थित होते. 

error: Content is protected !!