
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे नवीन प्रांताधिकारी म्हणून देसाईगंज गडचिरोली येथून सहाय्यक जिल्हाधिकारी जी. वी. एस. पवनदत्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाकडून त्यांच्यासह अन्य सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहेत. मागील आठवड्यात शासनाने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांची जालना येथे बदली केल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर इगतपुरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी ओमकार पवार यांची नियुक्ती केली होती. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी पद रिक्त होते. शासनाने आज मंगळवारी राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदलांमध्ये आयएएस अधिकारी असलेले जी. व्ही. एस. पवन दत्ता यांची इगतपुरीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदी तथा प्रांताधिकारीपदी बदली करण्यात आली. याबरोबर नाशिक महानगरपालिकेचे माजी आयुक्त अशोक करंजकर यांची वैज्ञानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली. नाशिकचे माजी उपजिल्हाधिकारी संजय कोलते यांची भंडारा येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आलेली आहे. याच बरोबरीने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर भंडारा येथून सावंत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.