बिटूर्ली येथे ग्राहक रक्षक समिती आणि ग्रामपंचायतीतर्फे विविध सामाजिक उपक्रम : प्रशासक साळूंखे आणि ग्रा. पं. अधिकारी डॉ. केदारे यांचे ग्रामस्थांनी केले कौतुक 

इगतपुरीनामा न्यूज – ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटूर्ली अंतर्गत बिटूर्ली येथे ग्राहक रक्षक समिती व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम व सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी महिला सक्षमीकरण, ग्राहक रक्षक जनजागृती, महिलांना साड्या वाटप, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला ग्रामसभेचे महत्व पटवून देणे, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कार्यक्रमांतर्गत गुणवंत महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योती केदारे यांनी आजपर्यंत ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटूर्ली अंतर्गत नागरिकांच्या हितासाठी व विविध अडचणीबाबत कायम पुढाकार घेतलेला आहे. माझी वसुंधरा ६.० अंतर्गत वृक्षारोपण, शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात डॉ. ज्योती केदारे कायम आग्रही असतात असे कौतुक ग्रामस्थ व महिलांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. आशा पाटील, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष डॉ. जानकी नाईक, इगतपुरी तालुकाध्यक्ष सविता कडाळी, कावनई पोलीस पाटील रुपाली शिरसाठ, माजी उपसरपंच अनिता काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या आयोजक प्रशासक मंजुषा साळुंके, ग्रामपंचायत अधिकारी डॉ. ज्योती केदारे यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. उपस्थित महिला, ग्रामस्थ यांनी आयोजकांसह प्रमुख मान्यवरांचे आभार व्यक्त केले. “आपला गाव आपला विकास” या अनुषंगाने ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आलेले शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या दहा महिलांना २६ जानेवारी कार्यक्रमावेळी किराणा तांदुळ व अन्य साहित्य ग्राहक रक्षक समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!