स्पर्धा परीक्षेत इतिहासाचे महत्व

स्पर्धा परीक्षेत इतिहास विषयात सुयोग्य मार्गदर्शन लाभले तर दर्जात्मक गुणवत्ता सिद्ध करता येते. अशा यशस्वीतेसाठी मार्गदर्शक अव्वल दर्जाचा लाभावा लागतो. ज्यांनी राज्यात गुणवंत विद्यार्थ्यांची मोठी फळी उभी केली असे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी यांचे आजचे मार्गदर्शन ह्याच अव्वल दर्जाचे असून सर्वोत्तम आहे. नक्की वाचून यशस्वी व्हा..!

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

इतिहास विषय
या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. असे असले तरी हा विषय अभ्यासाला अतिशय मनोरंजक, माहिती देणारा, जिज्ञासा जागविणारा आहे. या विषयाच्या अभ्यासासाठी प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, अर्वाचीन इतिहास असे साधारणतः कालखंड पाडलेले आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपण कोणत्या परीक्षेचा अभ्यास करतो ? हे सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे.

अभ्यासाचे महत्व
इतिहासाच्या अभ्यासाचे महत्व सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये लक्षात घेण्यासारखे आहे. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस शिपाई, शिक्षक पात्रता परीक्षा, बॅंक, रेल्वे, वेगवेगळ्या परीक्षांच्या सीईटी परीक्षा आदी सर्वच परीक्षांमध्ये इतिहासाचे प्रश्न येतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेत पेपर एक मध्ये History of India ( with special reference to Maharashtra ) and Indian National Movement. भारतीय इतिहास ( महाराष्ट्राच्या संदर्भात ) व राष्ट्रीय चळवळ या अभ्यास घटकाचा समावेश केलेला आहे. अशाप्रकारे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत इतिहासाचा अभ्यासक्रम दिलेला असतो. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत त्याचे अभ्यासघटक कमी जास्त असतात.

उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचा अभ्यास
या सर्व स्पर्धा परीक्षांमधील प्रश्न जर आपण काळजीपूर्वक अभ्यासले तर असे लक्षात येते की, हे सर्व प्रश्न आपण उच्च माध्यमिक स्तरापर्यंत अभ्यासलेले आहेत. यात नवे असे काहीच नाही.

उजळणीची आवश्यकता
स्पर्धा परीक्षेतील इतिहास विषयातील अभ्यास घटकांचा अभ्यास करताना एका वाचनाची आवश्यकता असते. हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ प्रश्न – शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
A. प्रधान
B. सुमंत
C. सरनोबत
D. मंत्री
या प्रश्नाचा योग्य पर्याय C सरनोबत हा होय. हा प्रश्न आपण शालेय अभ्यासक्रमात अभ्यासलेला आहे. प्रधान, अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधिश, सचिव, मंत्री, सुमंत हे अष्टप्रधान मंडळातील पदे होती. प्रत्येक पदाचे काम देखील आपण अभ्यासलेले होते. सरनोबत म्हणजे डंक्यावरील मुख्य अधिकारी होय. थोडक्यात या ठिकाणी एक वाचन किंवा उजळणीची आवश्यकता असल्याचे लक्षात येते.

सर्वच प्रश्नांचे स्वरूप सोपे
स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास विषयावरील सर्वच प्रश्न सोपे असल्याचे जाणवते. त्यामुळे यावरील प्रश्नांचे सर्वच्या सर्व गुण मिळविता येतात. हे महत्वाचे होय. उदा. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न – ‘कायमधारा’ पध्दत कोणी सुरू केली ?
A. लॉर्ड कॉर्नवॉलिस
B. विल्यम बेंटिग
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड डलहौसी
या प्रश्नाचा योग्य पर्याय A हा होय. ब्रिटिश अंमल भारतात स्थिर होताना ब्रिटिशांनी मुख्यतः कायमधारा पध्दती बिहार, बंगाल, ओरिसा या भागात तर तात्पुरता सारा पध्दत इतर प्रदेशांसाठी निश्चित केली. शेतसारा वसूल करण्याचा अधिकार जमीनदारांना देण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्यावरील सारा परंपरेनुसार कायम करण्यात आला. लॉर्ड कॉर्न वॉलिस गव्हर्नर जनरल असताना १७९३ मध्ये ही पध्दत सुरू झाली. हे आपण शालेय अभ्यासक्रमात शिकलो. त्यामुळे प्रश्न नवा होता, समजला नाही असे याविषयाचे प्रश्न सोडवताना होत नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
वरील प्रश्न हे सामान्य स्पर्धा परीक्षेतील होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पहा – १९०६ साली मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
A. वि. रा. शिंदे
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. गो. ग. आगरकर
D. धों. के. कर्वे
या प्रश्नाचा योग्य पर्याय A वि. रा. शिंदे हा होय. अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी १९०६ साली वि. रा. शिंदे यांनी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ ची स्थापना केली. त्याचे मुख्यालय १९२० साली पुण्यात आणले. या मिशनद्वारे दलितांसाठी शाळा, उद्योग, वसतिगृहे व दवाखाने उभे केले. १९३३ साली ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिला. या पद्धतीने कोणतीही स्पर्धा परीक्षा असो  त्यातील इतिहास या अभ्यास घटकातील प्रश्न सोपे असल्याचे दिसून येते.

इतर विषयांपेक्षा सोपे प्रश्न
वर उल्लेख केल्याप्रमाणे इतर जे विषय असतात त्यातील एखादा तरी प्रश्न न वाचलेला, न ऐकलेला सापडण्याची शक्यता असते. इतिहासावरील प्रश्नांबाबत तसे होत नाही. मग परीक्षा कोणतीही असो. उदाहरण जेआरएफ आणि नेट परीक्षेचा प्रश्न बघा. –  प्रश्न : भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
A. लोकहितवादी
B. न्या. म. गो. रानडे
C. महात्मा फुले
D. नारायण मेघाजी लोखंडे
या प्रश्नाचा योग्य पर्याय D नारायण मेघाजी लोखंडे हा होय. इ. स. १८८० च्या प्रारंभी नारायण मेघाजी लोखंडे यांनी ‘मिल हँड असोसिएशन सोसायटी’ स्थापन केली. भारतातील कामगारांची ही पहिली संस्था आणि लोखंडे हे तिचे पहिले अध्यक्ष होय. त्यांच्या प्रयत्नामुळे कामगारांचे कामाचे दिवस कमी करण्यात आले. महिला कामगारांना विशेष सवलती लाभल्या. या सर्व कार्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून संबोधले जाते.

थोडक्यात महत्वाचे
इतिहास विषयावरील जे अभ्यास घटक दिलेले असतात  ते डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. पूर्वीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेत कसे प्रश्न विचारलेत याचा देखील अभ्यास होणे महत्वाचे होय. थोडक्यात सर्वच प्रश्न आपण अभ्यास केला तर सोडवू शकतो. विद्यार्थ्यांनी आपली क्षमता ओळखणे गरजेचे आहे.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    या विषयाची व्याप्ती मोठी आहे. हा विषय भूत, भविष्य आणि वर्तमानाची माहिती देणारा, मार्गदर्शन करणारा विषय आहे. अतिशय महत्वाचा प्रभावी लेख आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    इतर विषय ज्या प्रमाणे अभ्यासले जातात, त्या प्रमाणे इतिहास विषयाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपल्या परिचयाचे घटक प्रश्न स्वरूपात येतात परंतु उजळणी नसल्यामुळे आपण ते सोडवू शकत नाहीत. या गोष्टीचं महत्व या मधून समजते.

Leave a Reply

error: Content is protected !!