
इगतपुरीनामा न्यूज, दि. 3
पोलीस हवालदारासह आणखी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील 4 संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. वाडीवऱ्हे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून कसून तपास सुरु केला आहे. स्थानिक गुन्हे पोलीस हवालदार प्रविण भाऊराव मासुळे, वय ४३ यांनी फिर्याद दिली आहे. भा. द.वि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. सारंग रंगनाथ माळी वय २३ वर्षे रा. माणिकखांब, तुषार प्रकाश भागडे वय १९ रा. तळेगाव इगतपुरी, नागेश हरिश्चंद्र भंडारी ( चिमण्या ) वय १८ वर्षे ०२ महिने रा. नांदगाव सदो, पुरुषोत्तम संजय गिरी ( गंगा ) वय १९ रा. वाडीवऱ्हे ता. इगतपुरी यांना अटक करण्यात आली आहे.
वाडीवऱ्हे येथील कवटी फाटा पोलीस चौकीच्या मागे हॉटेल ब्रम्हगिरी जवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश पाटील, निवृत्ती तातडे ( पुर्ण नाव, गाव माहित नाही.) यांना संशयित आरोपी यांनी आमचे वादात का पडले या कारणावरुन कुरापत काढली. आरोपी सारंग माळी याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील कोयत्याने पोलीस हवालदार योगेश पाटील याचे डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. आरोपी तुषार भागडे याने निवृत्ती तातडे याचे डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. आरोपी नागेश भंडारी, पुरुषोत्तम गिरी यांनी जखमी साक्षीदारांना वाईट साईट शिवीगाळ करुन जिवे मारण्याचा दम दिला अशी फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रविण भाऊराव मासुळे, वय ४३ यांनी दिली आहे. भा. द.वि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी अटक करण्यात आले आहेत. वाडीवऱ्हे पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.