पांडुरंगाची सेवा, पंढरीची वारी, नाम संकीर्तन आणि वारकरी संस्कृती जतन करणारे सखारामबाबा धांडे यांचे कार्य अलौकिक – कान्होबा महाराज मोरे : जन्माला येऊन आयुष्य सार्थक करण्यासाठी हरिनाम व ईश्वरसेवा बहुमोलाची

इगतपुरीनामा न्यूज – जन्माला येऊन आयुष्याचे सार्थक करण्यासाठी परमेश्वराने हा मनुष्य जन्म मनुष्याला दिला आहे. ह्या आयुष्याच्या साधनाने पांडुरंग परमेश्वराची प्राप्ती करता येते. म्हणूनच संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मी जन्म फक्त तुझी चरणसेवा साधण्यासाठी घेईल असे म्हटले आहे. हरीचे नामस्मरण, कीर्तन, संतांचे पूजन करून पंढरीच्या महाद्वारी लोटांगण घालू. हे सगळं झालं तर आमच्या घरी मोक्ष कामारी दासी होईल. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य पांडुरंगाची सेवा, पंढरीची वारी, नाम संकीर्तन आणि वारकरी संस्कृती जतन करण्याचे ईश्वरी कार्य केले असे वै. सखाराम पा. धांडे पूजनीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कुटुंबियांनीही वारकरी परंपरेत वृद्धी करण्यासाठी आपली शक्ती समर्पित केलेली आहे. वै. सखाराम बाबा यांच्या माध्यमातून सेवेची परंपरा अखंडित सुरूच राहील. एकही क्षण वाया न घालवता मोक्षप्राप्ती करण्यासाठी ह्या जन्मात चांगले काम उभे करण्यासाठी वारकरी परंपरा मौलिक असल्याचे निरूपण श्रीसंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज कान्होबा महाराज मोरे देहूकर यांनी केले. वै. हभप सखाराम सहादू पा. धांडे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या “घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरण सेवा साधावया ॥ १ ॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालू लोटांगण महाद्वारीं ॥ २ ॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःखें नाहीं चाड आह्मां ॥ ३ ॥ आणीक सायास न करीं न धरी आस । होईन उदास सर्व भावे॥ ४ ॥ मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका म्हणे ॥ ५ ॥” ह्या अभंगावर त्यांनी भाविकांना मंत्रमुग्ध करणारे कीर्तन केले. त्यांनी पुढे सांगितले की, सेवा करण्यासाठी अहंकार, पाप आणि अज्ञान ह्या तिन्ही गोष्टी अतिशय मारक आहे. निर्भर आनंद म्हणजे परिपूर्ण आनंद, दुःखाची किनारही न लाभलेल्या निर्भर आनंदाची प्राप्ती ईश्वर सेवेतून शक्य आहे. देहाला आल्यावर मोक्ष आणि मुक्ती मिळवायला पाहिजे. मोक्ष नियामक संतावाचून मोक्ष मिळणे सोपे नाही. यासाठी संतांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण प्रत्येक मनुष्यासाठी उपयोगी आहे. वर्षश्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल वै. हभप सखाराम सहादू पा. धांडे यांच्या पत्नी गं.भा. गंगुबाई सखाराम पा. धांडे, मुलगा इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास सखाराम पा. धांडे, अंबादास सखाराम पा. धांडे, मुलगी गं.भा. छबाबाई किसनराव धोंगडे, सौ. जनाबाई सुदामराव चौधरी, सौ. चंद्रकला भाऊसाहेब मते, सौ. विमल गणपतराव धोंगडे, सौ. कमल पोपटराव धोंगडे, सौ. निर्मला ज्ञानेश्वर भोर, सौ. जिजा राजाराम जाधव, पुतणे डॉ. सुहास बाळासाहेब पा. धांडे, पुतण्या सौ. अलका लक्ष्मणराव बुनगे, सौ. सुरेखा निवृत्ती कासार, सौ. आशा मुकुंदराव वाजे, नातू नंदलाल रामदास पा. धांडे, गोकुळ रामदास पा. धांडे, हर्षद रामदास पा. धांडे, कृष्णा अंबादास पा. धांडे, चि. अनुराग सुहास पा. धांडे, नात डॉ. कु. अमृता सुहास पा. धांडे, पणतू चि. अव्दैत नंदलाल पा. धांडे, चि. शौर्य हर्षद पा. धांडे, चि. देवांश गोकुळ पा. धांडे (पंतु), सौ. पुजा विलास धोंगडे, सौ. प्रियंका अमोल मते, कु. गाथा हर्षद पा. धांडे या सर्वांनी उपस्थितांचे ऋणनिर्देश व्यक्त केले. कीर्तन कार्यक्रमाचे संयोजन हभप अशोक महाराज धांडे, हभप पंढरीनाथ महाराज सहाणे यांनी केले होते. यावेळी इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरातून नातेवाईक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!