इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या युवक युवतीचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. एप्रिल मे २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यासाठी १ जानेवारी २०२४ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांनाही मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे. पुढील वर्षात २०२४ मध्ये १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबरला ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहे असे नवतरुण देखील आगाऊ पद्धतीने मतदार नोंदणीसाठी फॉर्म नंबर ६ भरून देऊ शकतात. आपल्याला तालुक्यातील तहसील निवडणूक शाखेत किंवा बीएलओंकडे त्यांना नोंदणी अर्ज देता येईल. याशिवाय स्वत:चा मोबाईल व ऑनलाइन पोर्टलवरूनही मतदार नोंदणी शक्य आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी केले आहे.
नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाऊनलोड करून घ्यावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपद्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करता येते. त्यासाठी योग्य कागदपत्रे अपलोड करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो. मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात. तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येते. गुगल प्ले स्टोअरवरील https:// play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येईल. voters.eci.gov.in या संकेतस्थळावरील पोर्टल द्वारे देखील नाव नोंदणी करता येईल.