‘गडवाट’च्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम : यावर्षी १० हजार विद्यार्थ्यांना करणार करिअर मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – “गडवाट – प्रवास सह्याद्रीचा” ही नामांकित संस्था प्रत्येक वर्षी एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवत असते. ही संस्था गडकिल्ले संवर्धन या विषयापुरती मर्यादित न राहता सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देत असते. ह्या पंधरा वर्षांच्या काळात शिवजयंती ज्ञानवर्धक, विज्ञानवर्धक, इतिहासवर्धक, डिजिटल शिवजयंती, टँकरमुक्त गाव, आरोग्यवर्धक शिवजयंती, दुर्गसंस्कारवर्धक शिवजयंती, गडकिल्ले संवर्धन शिवजयंती अशा पद्धतीने कार्य करून शिवरायांना खऱ्या अर्थाने मानवंदना देण्याचं काम गडवाट परिवाराने केलेलं आहे. विद्यार्थ्यांना वेळीच मार्गदर्शन न मिळाल्याने पात्रता असूनही करिअरमध्ये योग्य टप्पा गाठण्यात अडचणी येतात. शिवजयंती २०२५ ते २०२६ या वर्षासाठी करिअर मार्गदर्शन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जूनपासून आजपर्यंत कन्या विद्यालय, अकोले, संत गाडगे महाराज विद्यालय, नूतन विद्यामंदिर, साकुर ह्या शाळांमध्ये योगेश महाराज नागरे, राजू ठोकळ आणि संदीप पागेरे यांच्या मदतीने जवळपास १ हजार ५०० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. यावर्षी १० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा संस्थेचा मानस आहे. गडवाट संस्था स्थापन होऊन १५ वर्ष झाली. त्यानिमित्ताने त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या त्रिंगलवाडी आणि पत्र्याचीवाडी शाळा या दोन्ही शाळांमधील ३०० विद्यार्थ्यांना सहा किल्ल्यांची माहिती असणारे कव्हर आणि ३०० वह्या वाटप करण्यात आल्या. गडवाटमधील सर्व सदस्य सामाजिक बांधिलकी म्हणून एकत्र आलेले असून सर्व सदस्य समाज कार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात, अशी माहिती संस्थेचे सदस्य सीएमए भूषण पागेरे यांनी दिली.

error: Content is protected !!