
इगतपुरीनामा न्यूज – शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन साल्हेर दुर्गाला युनेस्कोचे ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ अंतर्गत जागतिक वारसा स्थळ म्हणुन मानांकन मिळाले. या प्रक्रियेत छत्रपतींचा मावळा म्हणून दाखविलेली सजगता, वारसास्थळाबद्दलची आपुलकी आणि हा वारसा जपण्याची तळमळ याशिवाय हे यश शक्य नव्हते. या अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी, तसेच दुर्ग संवर्धनात केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाशिक इतिहास संशोधन मंडळाने विशेष परिसंवाद व सन्मान समारंभ आयोजित केला होता. ऐतिहासिक वारसा संवर्धनातील सक्रिय सहभागामुळे, तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन प्रक्रियेत दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे ऐतिहासिक यश सर्वांसमोर उभे आहे. साल्हेर किल्ल्यासह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना आणि तामिळनाडूतील १ किल्ल्याला युनेस्कोने ‘मराठा मिलिटरी लैंडस्केप’ अंतर्गत जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला. मराठा साम्राज्याचा वारसा जपण्यासाठी संस्थेने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नासिक इतिहास संशोधन मंडळ व राज्य पुरातत्व विभागातर्फे शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्याला मिळालेला हा सन्मान संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. यावेळी अनेक दुर्ग संवर्धन संस्थांचा देखील सन्मान करण्यात आला. ह्या सन्मान समारंभासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पुरातत्व विभागाचे अमोल गोटे, स्मिता कासार, नासिक इतिहास संशोधन मंडळ अध्यक्ष योगेश कासार, सचिव चेतन राजापूरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सागर पाटील, सोमनाथ गव्हाणे, विजय महाले, बाळासाहेब शिंदे, ज्योती पाटील, कु. शिवांश पाटील व शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शाम गव्हाणे उपस्थित होते.