याला म्हणतात अस्सल कृषी अधिकारी..! : गाळात उतरून शेतकऱ्यांना दाखवले चारसूत्री भात लागवडीचे प्रात्याक्षिक : प्रत्यक्ष प्रात्याक्षिकामुळे शेतकऱ्यांनी केले इगतपुरी कृषी विभागाचे कौतुक

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – वातानुकुलीत कार्यालयात बसून शेतकऱ्यांना पिकांची लागवड, रोग नियंत्रण, खतांची मात्रा वगैरे ज्ञान पाजळवणारे कृषी विभागाचे अधिकारी राज्यभर आहेत. कडक इस्त्रीचे कपडे घालून चिखलापासून बचाव करीत अनेक अधिकारी शेताच्या बाजूला उभे राहतात. प्रत्यक्ष कृती, तोंडी किंवा कागदी मार्गदर्शन यामध्ये मोठा फरक दिसून येतो. त्यामुळे हाडाचे शेतकरी अशा वरवरच्या कृतिशून्य मार्गदर्शनाकडे हास्यास्पद कृती म्हणून पाहतात. यामुळेच कृषी विभागाच्या चांगल्या योजना आणि मार्गदर्शन परिणामकारक ठरत नाही. मात्र ह्या सगळ्यांना फाटा देऊन इगतपुरी तालुक्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः गुडघाभर गाळात उतरून चारसूत्री भात लागवड कशी करतात याचे प्रत्यक्ष उदाहरण सर्वांना दाखवून दिले. नाशिकचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके आदींनी मोगरे येथील शेतात प्रत्यक्ष भात लागवड कृतीचे प्रात्याक्षिक करून दाखवल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अधिकाऱ्यांचे कौतुक केले. भाताचे आगार असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात १२६ महसूली गावांत २८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यापैकी ४० टक्के शेतकऱ्यांनी चारसूत्री भात लागवड पद्धतीचा अवलंब केला आहे.  ह्या सर्व शेतकऱ्यांना इगतपुरीच्या कृषी विभागाकडून नियमितपणे मार्गदर्शन केले जाते. 

भाताच्या तुसाची काळी राख बी पेरण्यापूर्वी जमिनीत मिसळणे गरजेचे आहे. भात पेंडा नांगरणी वेळी शेतात गाडणे, गिरीपुष्प हिरवळ खताचा हेक्टरी दोन ते तीन टन वापर करणे, भाताच्या रोपांची १५ बाय २५ सेंमी अंतरावर नियंत्रित लागवड करणे, युरिया ब्रिकेटचा वापर करणे अशी चारसूत्री भात लागवड करण्याची पद्धत असल्याचे मार्गदर्शन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी केले. तालुक्यात भाताच्या इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, रुपाली, ओम ३, पूजा आर २४ या जातीसह नागली, वरई, सोयाबीन आदी पिके घेतली जातात. खतांच्या मात्रा, युरिया ब्रिकेटचा वापर कसा करावा आदी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार, सागर सिनारे, उप कृषी अधिकारी किरण सोनवणे, आबासाहेब आटोळे, सहाय्यक कृषी अधिकारी रूपाली बिडवे, प्रियंका पांडुळे, संगीता जाधव, रेणुका पाटील, विद्या फुसे, मोनिका जाधव, योगेश दाते, हरीश चव्हाण, कुंडलिक भोये, पठार शिवार आदिवासी शेतकरी गटाचे अध्यक्ष भगवंता लाव्हरे, सचिव देवराम गवारी, सरपंच प्रताप जाखेरे, सदस्य विलास भीमा जाखेरे, आनंदा गवारी, नामदेव लाव्हरे, शिवराम जाखेरे, अमृता जाखेरे, हारकू कानू लाव्हरे, नंदू रामचंद्र गवारी, दशरथ जाखेरे, धर्मनाथ जाखेरे, देवराम भोईर, शांताराम लव्हारे, नागेश जाखेरे आदी शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!