इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ – झपाट्याने विकासाच्या मार्गाने दमदार वाटचाल करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे उच्च क्षमतेचा मोबाईल टॉवर बसवण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या अखंडित प्रयत्नांना यश आले आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी स्वतः दखल घेत विशेष बाब म्हणून मोबाईल टॉवर मंजूर केला आहे. अतिदुर्गम असणाऱ्या मोडाळे परिसरातील कुशेगाव आणि सांजेगाव ह्या २ गावांमध्ये मोबाईलचे २ टॉवर आहेत. मात्र मधल्या भागात डोंगर येत असल्याने मोबाईलचे नेटवर्क मोडाळे गावकऱ्यांना मिळत नव्हते. यामुळे स्पर्धा परीक्षा अभ्यासार्थी, युवक, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना मोठा फायदा होणार आहे. यासह ह्या भागातील अनेक दुर्गम आदिवासी वाड्या मोबाईल नेटवर्कमुळे संपर्क क्षेत्रात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामस्थांतर्फे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे आभार मानले आहेत. मोडाळे गावाला एकदा भेट द्या अशी अपेक्षा श्री. अंबानी यांच्याकडे करण्यात आली आहे.
अल्पावधित शाश्वत विकासाचा आलेख उंचावत नेहमीच नवनवीन विकासासाठी अग्रेसर असणारे गाव म्हणून मोडाळे सुप्रसिद्ध आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके सातत्याने ह्या गावाच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या विकासासाठी अखंडित झटत आहेत. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मोडाळे गावात विकासगंगा आलेली आहे. मात्र ह्या गावात आल्यावर मोबाईलचे नेटवर्क गायब होत असल्याने विद्यार्थी आणि गावाकरी वैतागलेले होते. मोडाळे परिसरात असलेल्या डोंगरामुळे कुशेगाव आणि सांजेगाव हे दोन टॉवर असूनही गावकऱ्यांचे मोबाईल बिनकामाचे ठरत होते. शैक्षणिक ध्येयसिद्धीसाठी सध्याच्या काळात मोबाईलला नेटवर्क आवश्यक असल्याने जनतेची भावना गोरख बोडके यांनी समजून घेतली. रिलायन्स जिओ कंपनीचे जनसंपर्क अधिकारी प्रशांत जैन यांना भेटून त्यांनी कैफियत मांडली. मात्र ह्या गावाच्या जवळ दोन टॉवर असल्याने लोकांची मागणी पूर्ण होत नव्हती. नव्या टॉवरसाठी लाखोंचा खर्च करणे अवघड होते. मात्र गोरख बोडके यांनी श्री. जैन यांना विनंती करून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यापर्यंत आमच्या व्यथा पोचवा अशी मागणी केली. श्री. जैन यांनी तातडीने नियोजन करून मुकेश अंबानी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे सर्वांगीण चर्चा करून मोडाळेचा विकासाचा आलेख मांडला. मुकेश अंबानी यांनी ह्या गावाच्या विकासात योगदानासाठी विशेष बाब म्हणून टॉवर मंजूर केला. गोरख बोडके यांच्यामुळे आता मोडाळे गाव आणि परिसर नेटवर्कच्या कक्षेत आले आहेत.