
इगतपुरीनामा न्यूज – वर्षभरात इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा हे गाव ॲनिमियामुक्त करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून एकमेव पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. ॲनिमिया मुक्त गाव अभियान प्रभाविपाणार राबविण्यासाठी ह्या गावाची निवड करण्यात आली आहे. ह्या अभियानाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. यानिमित्ताने संपूर्ण वर्षभर आरोग्याबाबत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी सहाय्यक ट्रस्ट समन्वयक प्रमोद शिंदे यांनी आरोग्य, पोषण, आहार, परसबागेचे महत्त्व, शरीरामध्ये रक्त कमी होण्याचे दुष्परिणाम, पांढऱ्या पेशी व लाल पेशी याबद्दल माहिती दिली. ॲनिमियाचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर सेंद्रिय पोषण परसबागेची निर्मिती आपल्याला करावी लागेल. त्यातील पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक प्रतिष्ठानचे सहाय्यक समन्वयक निलेश पगारे यांच्या संस्थेमार्फत या एक ते दीड वर्षात गावातील महिलांच्या रक्तवाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून रक्तातील ऑक्सिजन वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत. इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, ग्रामपंचायत प्रशासक विस्ताराधिकारी साहेबराव देशमुख, ग्राम पंचायत अधिकारी श्रीमती हर्षिता पिळोदेकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या अभियानासाठी इगतपुरी पंचायत समिती स्तरावरून वेळोवेळी योग्य ती मदत दिली जाईल अशी ग्वाही गटविकास अधिकारी महेश वळवी यांनी दिली. या कार्यक्रमासाठी सीआरपी मालन वाकचौरे, महिला बचत गटातील सर्व अध्यक्ष व सचिव, आरोग्य कर्मचारी, आशासेविका, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती हर्षिता पिळोदेकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक चंद्रकांत गांगुर्डे यांनी मानले. उमेद तालुका अभियान व्यवस्थापक उज्वल सोनवणे, तालुका व्यवस्थापक दिपाली वाघ, उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका मोरे आदी उपस्थित होते.