
इगतपुरीनामा न्यूज – योग म्हणजे स्वतःला अनंताशी जोडणे होय, निसर्गाला जपणे हाच योगाचा उद्देश असून योगाच्या माध्यमातून मानवतेचे हित साध्य करणे शक्य आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग साधना अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन देवळे उभाडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन योगेश्वर सुरुडे यांनी केले. उभाडे येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे, जगदिश खैरनार, संध्या देशमुख, मंजुषा अहिरे, भारती बैसाणे, गायकवाड सर, वैशाली सुरुडे, दत्तात्रय कोरडे आदी उपस्थित होते. उभाडे येथील शाळेत दरवर्षी योग शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यात विद्यार्थ्यांना योगाचे विविध व्यायामाचे प्रकार शिकविले जातात. प्रत्येक क्रियेचे अर्थ व फायदे आणि महत्व समजावून दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय योग साधनेची ओळख होते. योगाचे जीवनात असलेले महत्व समजते. योग साधने विषयी अभिमान निर्माण होतो. निरोगी, सुदृढ व नैतिक आचरण करणारा आदर्श नागरिक घडण्यासाठी मदत होत असल्याचे मुख्याध्यापक पांडुरंग शिंदे यांनी सांगितले.