वाडीवऱ्हे पोलिसांची अवैध दारु हातभट्टयांवर धडक कारवाई : ४ लाख ७९ हजारांचा माल केला नष्ट : अवैध दारु धंदे करणाऱ्यांचे दणाणले धाबे ; गावकऱ्यांकडुन कारवाईचे स्वागत

इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीत आज नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांच्या सुचनांनुसार अवैध धंद्यावर धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाणे ह‌द्दीतील मुळेगांव, पारवेवाडी व कुशेगांव या गावांत अवैध दारु धंदे व गावठी दारुच्या भट्टयांवर कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस हवालदार मनोज येशी, हेमंत तुपलोंढे, श्रीकांत दोंदे, शिरीष गांगुर्डे, विशाल बोराडे, विकास गिते, विशाल सोनवणे, विक्रम काकड, सचिन नारायणे, उल्हास धोंडगे, धोंडीराम बोंबले, गांव कामगार पोलीस पाटील मुळेगाव व कुशेगांव यांच्यासह आज सकाळी ८ वाजे पासुन पोलीस अधिकारी व अंमलदरांची ३ पथके बनवली. पथकाकडून ८ ते १० किमी अंतर डोंगरमाथ्यावर जंगलात भर पावसात पायी चालत जावुन छापा टाकण्यात आला. या कारवाईत ३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गावठी दारु, गावठी दारु बनविण्याचे रसायन व साहित्य असा एकुण ४ लाख ७९ हजार ८०० रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. ह्या धडक कारवाईचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर यांनी स्वागत केले आहे. या कारवाईत सहभागी सर्व अंमलदारांचे अभिनंदन करून यापुढेही सत्वर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. ह्या कारवाईमुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून कारवाईचे स्वागत केले आहे.

error: Content is protected !!