इगतपुरीनामा न्यूज, दि. १
रस्ते विकासाची नांदी समजले जात असले तरी इगतपुरी तालुक्यात रस्त्यांची परिस्थिती भूषणावह नक्कीच नाही. प्रत्यक्षात सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. परिणामी रस्त्यांवर छोट्या मोठ्या अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. मुंढेगाव ते अस्वली स्टेशन या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. वाहनधारक मुकाट्याने सहन करीत असून संबंधित बांधकाम विभागाने हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी दिला आहे. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनाही खराब रस्त्याबाबत तुकाराम वारघडे यांनी निवेदन दिलेले आहे.
इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. मुंढेगावसह अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यावरून गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी घोटी, नाशिक येथे न्यावे लागते. मात्र खराब रस्त्यामुळे त्यांची हेळसांड होते. पावसामुळे रस्त्यांवरील मोऱ्या, खराब रस्ते आदींची बांधकाम विभागाने पाहणी करावी. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल.
- तुकाराम वारघडे, सामाजिक कार्यकर्ते
पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळे तयार झाले आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी गुळणी धरून बसलेले आहेत. कुऱ्हेगाव ते गोंदे दुमाला रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. पावसाने अधिकच रस्ता खराब झाल्याने वाहनधारकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. मोठे खड्डे आणि त्यात पाणी साचल्याने वाहने सतत नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. संबंधित बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी कायमच लेखी पत्रकाद्वारे होत असूनही रस्ते दुरुस्त का केले जात नाही असा सवाल तुकाराम वारघडे यांनी केला आहे. मुंढेगाव व गोंदे दुमाला या रस्त्याने अनेक कंपनी कामगार कामावर जात असतात. खराब रस्त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील वाढले आहेत. अनेक जणांना मणक्याचे आजार जडले आहेत. संबंधित बांधकाम विभागाने खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.