जिंदाल कंपनीपासून ३ किमीपर्यंत जमावबंदी आदेश लागू : कोणतेही सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि मिरवणूकीला बंदी

इगतपुरीनामा न्यूज – मुंढेगांव ता. इगतपुरी जि. नाशिक शिवारातील जिंदाल फोटो फिल्मस कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागलेली असून ही आग आजूबाजूला पसरत आहे. कंपनीतील रासायनिक साहित्य व गॅस टाकी यांना त्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून परिसरातील आजूबाजूचा तीन किलोमिटर परिसर बाधित होऊन मनुष्य व प्राणी यांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये, आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ३४ अन्वये सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रात तीन किलोमिटर परिसरात जमावबंदी लागू झाली आहे. ह्या परिसरात शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, दगड, काठी इत्यादी धोकादायक वस्तू घेऊन फिरण्यास मनाई करण्यात येत आहे. तीन किमी परिसरात उत्तेजक भाषणे, जाळणे, मिरवणुका काढणे यास मनाई आहे. तीन किमी परिसरात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम व भारतीय दंड संहिता अंतर्गत कारवाई करण्यात येईल. हा आदेश आपत्ती निवारणा होईल तोपर्यंत लागू राहील असे उपविभागीय अधिकारी यांनी काढलेल्या पत्रात नमूद केले आहे.

error: Content is protected !!