
इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात लाचखोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. तरीही लाचखोर सरकारी कर्मचाऱ्यांना कोणाचा धाक उरलेला नाही. हे आज पुन्हा सिद्ध झाल्याचे दिसून येते. फेरफार नोंद घेण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी सापळ्यात अडकले आहेत. मोडाळे येथील तलाठी योगिता धुराजी कचकुरे, वय ४२, रा. सोमेश्वर कॉलनी, प्लॉट नंबर ३, एबीबी कंपनी जवळ, सातपूर, नाशिक, वाडीवऱ्हेचा मंडळ अधिकारी दत्तात्रय मनोहर टिळे, वय ३५, रा. ६२५, टिळक पथ, भगूर, नाशिक अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक संदीप घुगे, सापळा पथकातील हवालदार गणेश निंबाळकर, संतोष गांगुर्डे, नितीन नेटारे यांनी ही यशस्वी कारवाई केली. आतापर्यंत अनेक सापळे घडूनही लाचखोर कर्मचारी अधिकारी सुधरायला तयार नसल्याने आगामी काळातही यशस्वी सापळे होतील असा विश्वास जागरूक नागरिकांनी व्यक्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
तक्रारीचे थोडक्यात स्वरूप असे तक्रारदार यांच्या आई वडीलांच्या मोडाळे, ता इगतपुरी येथे मिळकत आहे. सातबारावरील एका नोंदीबाबत ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, नाशिक यांच्याकडील दाव्यात निकाल लागून आदेश झाले होते. तक्रारदाराच्या वडिलांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आधीची फेरफार नोंद रद्द होणेकामी तहसीलदार, इगतपुरी, संशयित आरोपी तलाठी योगिता कचकुरे यांच्याकडे अर्ज केला होता. ह्या अर्जावर कार्यवाही करुन नोंद घेण्याच्या मोबदल्यात आरोपी योगिता कुचकुरे हिने १० हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारली. आरोपी मंडळ अधिकारी दत्तात्रय मनोहर टिळे याने नोंद मंजूर करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपये लाचेची मागणी स्वतः साठी केली. आरोपी तलाठी योगिता कुचकुरे हिला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. एससीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सापळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.