दारू विक्रेत्याला ना हरकत दाखला न देण्यासाठी विल्होळी येथील महिलांच्या विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर

 लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. या व्यसनामुळे मुंबई आग्रा महामार्गवर अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी महिलांच्या मागणीवरून विल्होळी ग्रामपंचायतीने महिला ग्रामसभेत पुढाकार घेतला आहे.  नाशिक महामार्गावरील  विल्होळी येथे सदर दारू विक्रेत्या परवाना धारकास ना हरकत दाखला न देणेबाबत आजच्या ग्रामसभेत महिला आक्रमक होत्या. शासनाच्या नियमानुसार महिलांना सर्वप्रथम प्राधान्य देत येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी सरपंच जानकाबाई शिवाजी चव्हाण होत्या.  सदर ना हरकत दाखला न देणेबाबत मागच्या महिन्यात ग्रामसभा झाली होती. मात्र महिला उपस्थित नसल्याने या विषयाला पूर्णविराम मिळाला होता. गावात 104 गट नंबरवर  सरकारी परवाना धारकांनी देशी दारू दुकान टाकण्यास ग्रामपंचायतीकडे काही दिवसांपूर्वी शिफारस केली होती. यात महिलांचा मोठा विरोध होता. मात्र महिलांच्या आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारून सदर दुकानाला ना हरकत दाखला न देण्याबाबत सर्वानुमते संमती देऊन ठराव मंजूर करण्यात आल्याने महिलांनी आभार मानले. दरम्यान येथे जवळच औधोगिक वसाहत असून अनेक कामगार कंपनीत कामावर जातात. मात्र व्यसनांमुळे छोटे मोठे अपघात घडतात.
विल्होळी येथे रोजगाराच्या शोधात बाहेरील जिल्ह्यातील  अनेकांनी भाजीपाला सारखे छोटे व्यवसाय सुरू केले आहे. मात्र त्यांची मुलेही व्यसनाधीन होऊ नये हा त्यांचा मूळ हेतू असून सदर ग्रामपंचायती तसेच महिला सरपंच जानकाबाई चव्हाण यांनी सदर दारू दुकानाचा विरोध दर्शवल्याने परिसरातील महिलांसह ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
यावेळी महिला ग्रामसभेत बचत गटाच्या महिलांनी समस्या मांडल्या. यानंतर लगेच पुरुषांची ग्रामसभा घेण्यात आली. यात पिण्याचे पाणी, घरकुल योजना, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था आदी विषय ग्रामस्थांनी मांडले यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!