
इगतपुरीनामा न्यूज – क्रिकेट जगतात आयपीएल हा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. हा सोहळा प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानात जाऊन पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आणि शालेय विद्यार्थ्यांची इच्छा असते. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव या तिन्ही गावातल्या जिल्हा परिषद शाळेतील २०० विद्यार्थ्यांना ही अभूतपूर्व इच्छा पूर्ण करता येणार आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने अतिदुर्गम आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये आज आयपीएलचा सामना पाहता येणार आहे. मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथील २०० विद्यार्थ्यांसाठी ५ बस आज सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना रवाना केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला. वानखेडे स्टेडिअमवरील क्रिकेटचे तिकीट, नास्ता, जेवण आणि मजेदार वस्तू विद्यार्थ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या आहेत. आयपीएल फिवरमध्ये एकदा तरी मैदानात जावून प्रत्यक्ष क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद आज विद्यार्थ्यांकडून घेतला जाणार आहे. याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी रिलायन्स फाउंडेशनचे ऋण व्यक्त केले आहे.