त्र्यंबकेश्वरच्या “माऊली” ने वाटले 1 हजार 35 गावकऱ्यांना फुकट धान्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली गावातील 212 लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे गहू आणि तांदळाचे फुकट वाटप इथले रेशन दुकानदार ज्ञानेश्वर मेढेपाटील यांनी सामाजिक जाणिवेतून केले. आंबोली कार्यकारी सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात ज्ञानेश्वर माऊली सेल्समन म्हणून काम पाहतात. आंबोली येथील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांच्या हाताला काम नसल्यामुळे ते गेल्या महिन्यापासून घरातच बसलेले आहेत. त्यांचा रोजगार पूर्णपणे बंद असल्याने ज्ञानेश्वर माऊलींनी सामाजिक बांधिलकी म्हणून 90 टक्के लाभार्थ्यांना पैसे न घेता धान्याचे वाटप केले. एप्रिल महिन्यात आलेले स्वस्त धान्याचे वाटप फुकट करण्यामुळे परमेश्वराची सेवा करण्याची संधी मिळाली असे त्यांनी सांगितले. फुकट वाटलेल्या धान्याची रक्कम त्यांनी स्वतः पदरमोड करून चलनाद्वारे शासनजमा केली आहे. त्यांच्या ह्या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामस्थ आनंदित  झाले आहेत. गावातील 212 कार्डधारकांच्या घरातील 1 हजार 35 व्यक्तींना त्यांच्या फुकट धान्य वाटपाचा फायदा झाला.
आंबोली गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने नागरिक आपल्या घरात राहणे पसंत करत आहेत. अशा संकटकाळात शिधापत्रिकेवरील धान्याशिवाय कुठलीही मदत होत नाही. हाताला रोजगार नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना धान्य घेण्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या विवंचनेत होते. अशा कठीण काळात गोरगरिबांच्या मदतीला स्वतः रेशन दुकानदार ज्ञानेश्वर माऊली मेढेपाटील धावले. 1 हजार 35 व्यक्तींना फुकट धान्य वाटपाचा फायदा झाला.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने काळजावर दगड ठेऊन प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ देण्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. जीवाची पर्वा न करता पॉजिटीव्ह रुग्णाच्या घरातील सदस्यांचे मशीनवर अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. पर्याय नसल्यामुळे काही पॉजिटीव्ह रुग्णांचेही माउलींना अंगठ्याचे ठसे घ्यायला लागले. घराघरात कोरोना रुग्ण असूनही ज्ञानेश्वर माऊली मेढेपाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फुकट धान्य वाटपाचे काम पूर्ण केले. रेशन दुकानातील धान्य पदरमोड करून गावातील लाभार्त्यांना फुकट वाटणारे “माऊली” नाशिक जिल्ह्यात आदर्श ठरले आहेत.

अतिशय भयानक काळात चूल पेटवून दोन घास खाण्यासाठी गोरगरिबांकडे धान्यासाठी पैसे नव्हते. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात येत होती. आईवडिलांच्या आशीर्वादाने सर्व लाभार्थ्यांना फुकट धान्य देऊन शासनाचे पैसे स्वतः भरायचा निर्णय घेतला. 1 हजार 35 लाभार्थ्यांना फुकट धान्य वाटून आत्मिक आनंदाची कर्तव्यपूर्ती केल्याचा आनंद वाटला.
ज्ञानेश्वर मेढेपाटील, रेशन दुकानदार आंबोली

Similar Posts

Comments

Leave a Reply

error: Content is protected !!