
इगतपुरीनामा न्यूज – डॉक्टर हे देवाचं दुसरं रूप असतात हे विधान किती सार्थ आहे याची प्रचिती नुकत्याच मालेगावातील एका घटनेमध्ये पहायला मिळाली. मालेगाव शहरातील एका कुटुंबात सात महिन्याचे बाळ घरात नेहमीप्रमाणे खेळत असताना त्याने चुकून शेजारी पडलेली हेअरक्लिप तोंडात घातली. वेळेत कुणाचेही लक्ष न गेल्याने बाळाने ती क्लिप गिळण्याचा प्रयत्न केला आणि क्लिप घशात अडकून पडली. त्याला श्वास घ्यायला अडचण यायला सुरुवात झाली, श्वास अडकला तसे कुटुंबीय घाबरले. बाळाने नक्की काय गिळले आहे कुणालाही सांगता येत नव्हते. मात्र एक्स रे काढल्यानंतर हेअरक्लिप गिळल्याचे लक्षात आले आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
बाळाला तातडीने मालेगाव शहरातील शौर्या इएनटी हॉस्पिटलमध्ये डॉ. शुभांगी अहिरे यांच्याकडे आणण्यात आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून डॉ. अहिरेंनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे ठरवून कुटुंबियांना तशी कल्पना दिली. बाळ खूपच लहान असल्याने अर्थातच शस्त्रक्रियेतली जोखीमही मोठी होती. कुटुंबीयांनी तातडीने संमती दिल्यानंतर ताबडतोब डॉ. अहिरे यांनी बाळाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. अखेर बऱ्याच अथक प्रयत्नांनी नाजूक शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर घशात अडकलेली हेअर क्लिप बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. बाळाचा श्वास पूर्ववत सुरू झाला आणि सगळ्यांचाच जीव त्या क्लिपच्या रूपाने अखेर सुखरूप भांड्यात पडला!
"अवघ्या सात महिन्याच्या बाळाने नक्की काय गिळले आहे हेही कुटुंबियांना सांगता येत नव्हते. एक्स रे काढल्यानंतर हेअरक्लिप दिसली आणि परिस्थितीचे गांभीर्य आणखीच वाढले. शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय समोर असला तरी त्यात मोठी जोखीम सुद्धा होती. कुटुंबियांच्या संमतीने धाडस केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि बाळाचा जीव वाचला याचा आनंद आहे. घरातल्या लहान बाळाला कधीही एकटे सोडू नये. बाळाच्या घशात एखादी वस्तू अडकणे हे प्रचंड धोकादायक आहे. दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडली तर डॉक्टरांना जबाबदार धरले जाते. आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करतच असतो, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांना सुद्धा मर्यादा असतात. रुग्णाचा जीव जोखमीत टाकण्यापेक्षा अशा घटना होवू नयेत म्हणून कुटुंबियांनी काळजी घ्यायला हवी."
- डॉ. शुभांगी अहिरे, शल्य चिकित्सक, शौर्या इ एन टी हॉस्पिटल, मालेगाव

