
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले आहे. मात्र असे असतांना इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाकडून परवानगी न घेता बिनधास्तपणे सोहळ्यामध्ये निर्धारित संख्येपेक्षा जास्त गर्दी दिसून आली आहे. ग्रामपंचायतीसह प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन होऊनही कारवाई नसल्याने आगामी काळात कोरोना उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे.
शासनाने कोरोना रोखण्यासाठी कार्यक्रमातील उपस्थितीबाबत सक्त ताकीद दिलेली आहे. त्यानुसार लोकांवर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. इगतपुरी तालुक्याच्या शहरी नागरिक निर्बंध व संक्रमण आदी कारणास्तव नियम पाळत आहेत. परंतु ग्रामीण भागात शेती-मळे आदी भागात गर्दी जमवून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये सरळसरळ नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. यापूर्वी इगतपुरी तालुक्यात लग्नविधी व कार्यक्रम किती महागात पडले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तरीही ग्रामीण भागात आड रस्त्याला कार्यक्रम ठेवले जातात. संबंधित प्रशासनाकडून परवानगी घेतली जात आहे का ? हे देखील पडताळून पाहण्याचे कष्ट ग्रामपंचायत व त्यांचे जबाबदार पदाधिकारी घेत नाहीत. यामुळे कोरोना संक्रमनाचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता आहे. हकनाक अनेकांना बाधित व्हायला कारणीभूत ठरणाऱ्या सोहळ्यांकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतींनी कार्यक्रम संयोजकाकडून कार्यक्रमाची माहिती घेऊन त्यांना योग्य सूचना देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमाची परवानगी घेऊनच कार्यक्रम पार पाडणे ही काळाची गरज झाली असून अंमलात आणायला हवे असे मत जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.