इगतपुरीनामा न्यूज – जानोरी अस्वली रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम एका आठवड्यात तातडीने पूर्ण करून ह्या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन इगतपुरीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ च्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिले. त्यामुळे ह्या पुलाखाली आज सकाळी सुरु झालेले बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आले. बेलगाव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन आंदोलक शेतकऱ्यांचे समाधान केले. “इगतपुरीनामा” डिजिटल पोर्टलद्वारे ह्या प्रश्नाची बातमी करून वाचा फोडण्यात आली होती. बांधकाम खात्याने दिलेल्या पत्रात “इगतपुरीनामा” बातमीचा संदर्भ देण्यात आलेला आहे. दीड वर्षापासून रखडलेल्या पुलामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्यायेण्याचे प्रचंड हाल सुरु होते. वैतागलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी वळसे घालून फेरा मारावा लागत होता. त्यामुळे जोपर्यंत ह्या रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत त्रस्त शेतकार्याकडून पुलाखाली मुक्काम करून बिऱ्हाड आंदोलन आज सुरु झाले होते. एकतर पुलाचे काम पूर्ण करा अथवा तिथून वाहणाऱ्या पाण्यात आम्हालाही वाहून जाऊ द्या अशी मागणी बेलगांव कुऱ्हेचे माजी सरपंच संतोष सुखदेव गुळवे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलक शेतकऱ्यांनी केली होती. अधिकाऱ्यांनी आश्वासन न पाळल्यास जलसमाधी घेऊ असे यावेळी घोषित करण्यात आले. आंदोलकांनी “इगतपुरीनामा”चे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. आंदोलनाप्रसंगी माजी सभापती सोमनाथ जोशी, बाजार समिती संचालक अर्जुन भोर, ॲड. भाऊसाहेब भोर यांच्यासह भागातील शेतकरी पत्रकार विक्रम पासलकर, माजी सरपंच बाजीराव गोहाड, कैलास संधान, गोकुळ गुळवे, कोंडाजी गुळवे, राजाराम पासलकर, राजाराम गायकर, बंडू धोंगडे, ज्ञानेश्वर कोकणे, विलास संधान, नाना भोर, बाळू मुसळे, सुरेश कोकणे, बाळू पासलकर, कृष्णा कोकणे, ज्ञानेश्वर संधान, प्रकाश पासलकर, एकनाथ भोर आदी असंख्य शेतकरी हजर होते.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group