
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद हे रामायण कालखंडातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. ह्या ठिकाणी अनेक साधू संत, महंत भाविक नियमितपणे दर्शनासाठी येतात. २०२७ च्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सुद्धा हजारो भाविक गर्दी करणार आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वरचे शाहीस्नान आणि महापर्वणी काळाच्या अनुषंगाने सर्वतीर्थ टाकेद मंदिर आणि परिसराचा विकास करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणाचे महत्व वाढवल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी तयार होतील. आगामी कुंभमेळ्यासाठी याठिकाणी विविध प्रकारचा विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. याबाबत माऊली फाउंडेशनचे संस्थापक विनायक काळे हे कृषी मंत्री ना. माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेणार आहे. सर्वतीर्थ टाकेद येथे साधूसंत भाविक भक्तांना योग्य सुविधा प्राप्त होणे गरजेचं आहे. सिंहस्थ कुंभमेळा कृती आराखड्यात साकुरफाटा ते भरविर बुद्रुक, भंडारदरावाडी व सर्वतीर्थ टाकेद ते अधरवड फाट्यापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात यावा. सर्वतीर्थ टाकेदला भक्तनिवास, पार्किंग आदी सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे विनायक काळे आणि भाविकांनी सांगितले.