इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
गणेशोत्सव आणि गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्यांतर्गत विविध नियोजन सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इगतपुरी शहर, संवेदनशील आणि महत्वाच्या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सशस्त्र पोलिसांनी आज संचलन केले. इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजेंद्र दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो पोलीस रस्त्यावर उतरले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी खालची पेठ, बुद्धविहार, रेल्वेस्थानक, सेंट्रल पॉइंट, पटेल चौक, लोया रोड, नवा बाजार, कोकणी मोहल्ला, राम मंदिर, तीन लकडी या भागात शक्तीप्रदर्शन केले. जोरदार पाऊस बरसत असतानाही न थांबता भर पावसात हे सशस्त्र संचलन करण्यात आले. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरात आज सायंकाळच्या सुमारास इगतपुरी पोलीस ठाणे, लोहमार्ग पोलीस ठाणे इगतपुरी, राईट कंट्रोल पोलीस यांच्यावतीने शहरात शांतता नांदावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे सशस्त्र संचालन करण्यात आले.
गणेशोत्सव आणि गौरी गणपती हे सण शांतता आणि निर्भीड वातावरणात व्हावेत यासाठी इगतपुरी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येते आहे. यासाठी आमच्याकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सशस्त्र संचालन करून शक्तिप्रदर्शन केले आहे. नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे अपेक्षित आहे.
- वसंत पथवे, पोलीस निरीक्षक इगतपुरी
गणेशोत्सव सुरु असल्याने इगतपुरीचे ग्रामीण पोलीस दल, रेल्वे पोलीस आणू राज्यभरातून तसेच राज्याबाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी आज सशस्त्र संचलन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश या संचालनाद्वारे देण्यात आला. सण आणि उत्सव शांततेच्या वातावरणात व्हावेत यासाठी पोलिसांची भूमिका, बंदोबस्त महत्वाचा आहे. यासाठी इगतपुरीसह जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत झाले आहेत. पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी सांगितले की ह्या उत्सव काळात इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर 24 तास पोलीस पथकाचे सूक्ष्म लक्ष राहणार आहे. ह्या काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कुमक तैनात ठेवली जाणार आहे. संचालनामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिंदे, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, सोपान राखोंडे, संदीप शिंदे, मुकेश महिरे, महिला पोलीस आदींसह शेकडो पोलीसांनी सहभाग घेतला.